प्रवीण पोटे पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 25 लाखाची मदत

धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द

* लवकरच 8 ट्रक साहित्य देखील पाठविणार

अमरावती /3 ऑक्टोबर : पंजाबमधील पुरग्रस्तांना 5 लाख रुपयांची मदत पाठवल्यानंतर माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि श्रेयस पोटे पाटील यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी भाजप नेते शिवराय कुलकर्णी, किरण महल्ले, दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, चेतन पवार, दीपक पोहेकर आदी उपस्थित होते. तसेच प्रवीण पोटे पाटील आणि श्रेयस पोटे पाटील यांनी 8 ट्रक अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पाठवण्याची घोषणाही केली. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या दुर्दशेने दोघेही खूप दुःखी झाले असून त्यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला.

उल्लेखनीय म्हणजे, प्रवीण पोटे पाटील यांनी याआधीही भूकंप आणि पूरग्रस्तांना मदत केली आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी राज्यात किंवा देशातील नैसर्गिक आपत्तींमध्ये उदारतेने योगदान दिले आहे. 2005-06 मध्ये त्यांनी शेतकर्‍यांच्या मुलींसाठी मोठ्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते. त्यापूर्वी 1991 च्या मोहाड आणि 1993 च्या किल्लारी भूकंपात त्यांनी महत्त्वपूर्ण साहित्य, निधी आणि अन्नधान्य पुरवले होते. 2001 मध्ये गुजरातमधील भूज भूकंपात त्यांनी 42 दिवस सतत अन्नदान साहित्य पुरवले तसेच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विनंतीवरून घर बांधणीसाठी साहित्य उपलब्ध करून दिले. 2008 च्या बिहार पुरात त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मदत निधी पाठविला होता.

कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी ऑक्सिजन प्लांटची स्थापना केली, हिंदू स्मशानभूमीत गॅसद्वारे अंत्यसंस्कार सुविधा उपलब्ध करून दिल्या, लोकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप केले आणि सरकारी रुग्णालयांमध्ये 400 बेड व 90 बेडची व्यवस्था केली. त्याचबरोबर एअर कंडिशनर, वॉटर कूलर, टीव्ही सेट, झुंबर, चटया आदी साहित्यही देण्यात आले. पोटे पाटील ग्रुपने कर्करोग रुग्णालय, अच्युत महाराज रुग्णालय व पीडीएमएमसी रुग्णालयांना विविध उपकरणे व डायलिसिस मशीन पुरवल्या. त्यांनी मुंबईत कर्करोग रुग्णांसाठी 1,000 निवारागृहे स्थापन केली, कायमस्वरूपी निवास व अन्नपुरवठा केला, तसेच व्हीटी स्टेशनवरील गाडगे बाबा धर्मशाळेच्या पुनर्विकासात योगदान दिले. अपंग, निराधार, अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना देखील त्यांनी मदत केली असून महाविद्यालयीन व शाळेची फी भरून दिली. बडनेरा महानगरपालिकेच्या निवारा केंद्राला चार टेलिव्हिजन संच दान केले. संकटाच्या काळात एकमेकांना मदत करणे हीच खरी भारतीय संस्कृती असल्याचा संदेश पोटे पाटील ग्रुपने दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button