प्रवीण पोटे पाटील यांची निराधारांना मदत देऊन दिवाळी साजरी
बडनेरा केंद्रात निराधारांना जीवनावश्यक साहित्य वितरण

* अभ्यंगस्नानाने कार्यक्रमाची सुरुवात
अमरावती / 19 ऑक्टोबर – दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि आपलेपणाचा सण आहे. या सणाची खरी भावना समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, श्रेयस पोटेपाटील आणि श्रृतीताई पोटे-पाटील यांनी दरवर्षी प्रमाणे दिवाळी अनोख्या उपक्रमाने साजरी केली. प्रवीण पोटे-पाटील कुटुंबाने अमरावती महानगरपालिकेच्या आधार केंद्रातील निराधार रहिवाशांसोबत दिवाळी साजरी करून नागरिकांसमोर आदर्श ठेवला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात अभ्यंगस्नानाने झाली. त्यानंतर गरजूंना नवीन कपडे, नाश्ता, मिठाई आणि जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. हा उपक्रम केवळ सामाजिक मदतीपुरता मर्यादित न राहता, त्यांच्या जीवनात थोडा आनंद आणि प्रकाशही आणला. दिवाळीनिमित्त पुराण पोळीचे मिष्ठान्न गोरगरीबांना दिले गेले. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले की, गरजू आणि वृद्ध नागरिकांना मदत करणे ही सामाजिक जबाबदारी आहे, आणि दिवे लावून आपण त्यांच्या जीवनात प्रकाश आणू शकतो. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे दिवाळी साजरी केल्याने मिळणारे आध्यात्मिक समाधान अवर्णनीय आहे.
श्रेयस पोटे-पाटील यांनीही उपस्थितांना संबोधित करून सांगितले की, सामाजिक वचनबद्धता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, आणि तरुण पिढीने अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभाग घेणे हे खरे बदल घडवून आणण्याचा मार्ग आहे. यापूर्वी प्रवीण पोटे-पाटील यांनी या आधार केंद्राला टीव्ही, वॉटर कुलर, डेझर्ट कुलर आणि इतर जीवनावश्यक वस्तू दान केल्या असून, त्यांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे.
कार्यक्रमात शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, तुषार भारतीय, चेतन पवार, डॉ. प्रशांत देशपांडे, चेतन गावंडे, सुरेखाताई लुंगारे, लताताई देशमुख, रश्मी नावंदर, स्वाती निस्ताने, भारती गुहे, सतीश करेसिया, प्रकाश पुंड, डॉ. बबन लायडे, मनीष चौबे, अभिजित वानखडे, संजय कटारिया आदी उपस्थित होते.




