‘प्रहार’ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पत्ते खेलो’ आंदोलन
कृषीमंत्री कोकाटेंचा निषेध, राजीनाम्याची मागणी

अमरावती / 21 जुलै : एकीकडे राज्यातील शेतकरी संकटात आहे, त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देण्याऐवजी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनादरम्यान थेट सभागृहातच मोबाईलवर जंगली रमी हा ऑनलाईन गेम खेळताना आढळून आल्याने, त्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाने संताप व्यक्त केला आहे. आपल्या या कृतीतून कृषीमंत्र्यांनी राज्यातील शेतकर्यांचा अपमान केला आहे, असा आरोप करित प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पत्ते खेलो’ आंदोलन केले व कृषीमंत्र्यांचा निषेध नोंदविला. यावेळी जिल्हाधिकार्यांना एक निवेदन सादर करुन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. त्यात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांमार्फत राज्याच्या राज्यपालांना निवदेन सादर करण्यात आले. कृषीमंत्री वारंवार आपल्या वक्तव्यातून किंवा कृतीतून शेतकर्यांचा अपमान करित आले आहेत. त्यातून त्यांची शेतकर्यांप्रती असंवेदनशिलता दिसून येते. अशा व्यक्तीने कृषीमंत्रीपदावर राहणे शेतकर्यांकरिता हितावह नाही, असे नमूद करुन प्रहार पक्षाने माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर रमी गेम खेळून तर त्यांनी त्यांच्यातील अनास्थेचा परिचयच दिला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. निवेदन देतेवेळी प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके, संपर्क प्रमुख गोलू पाटील, युवक आघाडी प्रमुख मनीष पवार तसेच शेषराव धुळे, जय वानखडे, अरुण शेळके, सोनल खंडारे आदी उपस्थित होते.




