अन्यायग्रस्त महिलेच्या मदतीला पोहोचली प्रहार संघटना

रोषनखेडा येथील नायब तहसिलदारांचा आदेश दाखवुन पाडले घर

वरुड । 1 ऑक्टोबर – सगळीकडे नवरात्रीच्या उत्सवात स्त्रीशक्तीचा जागर सुरु असताना, काल (ता. 29) तालुक्यातील रोषणखेडा येथील विधवा महिलेचे घर नायब तहसिलदार यांच्या आदेशाचे पत्र दाखवून पाडण्यात आले. त्या महिलेच्या मदतीला वरुड तालुका प्रहार संघटनेने धाव घेऊन तहसिल कार्यालय येथे आज ठिय्या आंदोलन केले. रोषणखेडा येथील महिलेचे खाजगी जागेत अतिक्रमण असल्याची तक्रार करून, अतिक्रमण तोडण्यासाठी अमरावती पोलीस अधीक्षकांकडून संरक्षण मागवून पोलीस संरक्षणात सदर घर जमिनदोस्त करण्यात आले. मदतीसाठी धाव घेतली तरी महिलेची कुठूनही दखल घेतली गेली नाही. शेवटी तिने ही बाब प्रहारचे अजय चौधरी व प्रणव कडू यांना सांगितली. त्या महिलेसह तिची दोन अपत्ये शिक्षण घेत असून घर पाडल्याने रस्त्यावर आली. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी प्रहार संघटनेच्या वतीने पाडलेल्या घरातील साहित्य तहसिल कार्यालयात नेण्यात आले. त्याचबरोबर उपाशीपोटी राहिलेल्या महिलेबरोबर तहसिलदार यांच्या दालनातच जेवण करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या वेळी प्रहारचे तालुका संघटक अजय चौधरी व तालुका प्रमुख प्रणव कडू यांनी तहसिलदार यांना प्रश्न विचारले की, नायब तहसिलदारांना कुणाचे घर पाडण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे का? याकरिता न्यायालयीन आदेश आवश्यक नसतात का? तसेच ज्या दिवशी नोटीस दिली, त्याच दिवशी घर पाडणे नियमात बसते का? अशा प्रश्नांची त्यांनी उपस्थिती केली. तहसिलदार रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी या प्रकरणात काही चूक झाल्याचे मान्य करत यापुढे महिलेवर अन्याय होणार नाही, अशी खात्री दिली. त्यामुळे प्रहारचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

या आंदोलनात आक्रमण संघटनेचे अध्यक्ष गजानन ब्राम्हणे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे विलास पंडागळे, लिलाधर काकडे, अजय बहुरुपी, सुरेश नागले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रहारच्या या ठिय्या आंदोलनामुळे प्रकरण तात्पुरते मावळले असले तरी पुढील प्रशासनिक कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात एखाद्या विधवा महिलेचे घर पाडून तिला बेघर करणे ही शोकांतिकाच आहे. मात्र, अशा वेळी प्रहार संघटनेने स्त्रीशक्तीला आधार देत पुढे आल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button