आज शक्ती प्रदर्शन; अचलपूर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दावेदारी करणार

परतवाडा/16 नोव्हेंबर – अचलपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असल्याने अचलपूर व परतवाडा शहरांमध्ये सकाळपासून मोठी राजकीय धामधूम सुरू आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी उमेदवारांची हालचाल वाढली असून, नगरपालिका कार्यालय परिसरात विशेषतः दुपारपर्यंत मोठी गर्दी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेकांनी मागील काही दिवसांत आपली नामांकने दाखल केली असली तरी महत्त्वाचे दावेदार आजच अर्ज घेऊन कार्यालयात येत असल्याने संपूर्ण परिसरात उत्सुकता वाढलेली आहे. आज तिन्ही प्रमुख पक्षांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होणार असल्याने शहरात राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेल्या रूपाली माथने यांच्या समर्थनार्थ आज भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. परतवाडा आणि अचलपूर या दोन्ही शहरांमधून वाहनांचा ताफा, रॅली आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसणार आहे. रॅली शेवटी अचलपूर नगरपरिषद कार्यालयात पोहोचून माथने यांचा बी-फॉर्म अधिकृतरीत्या जोडण्यात येणार आहे. भाजपच्या या आयोजनामुळे पार्टी आपल्या ताकदीचा प्रत्यय देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. शिवसेना (उभाठा गट) देखील आज आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे. राधिका घोटकर यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी मोठी तयारी केली असून, सकाळपासूनच विविध भागातून कार्यकर्त्यांची हालचाल दिसत आहे. रॅली नगरपालिका कार्यालयाकडे मार्गस्थ होणार असून, नामांकन प्रक्रियेदरम्यान मोठी उपस्थिती राहणार आहे. काँग्रेस पक्ष आज अचलपूर आणि परतवाड्यातून मोठी रॅली काढून आपल्या उमेदवारासाठी बी-फॉर्म जोडणार आहे. काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने काँग्रेसही या निवडणुकीत ताकतीने उतरल्याचे दिसते. तिन्ही पक्षांच्या शक्ती प्रदर्शनामुळे अचलपूर-परतवाडा या दोन्ही शहरांमध्ये दिवसभर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. विविध भागातून येणारे ताफे, नागरिकांची ये-जा आणि उमेदवारांचे वाहन ताफे यामुळे प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण जाणवत आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मुख्य चौक आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर बंदोबस्त वाढवला आहे.
नगरपरिषद कार्यालय परिसरातही उमेदवार, प्रस्तावक, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी वर्दळ कायम आहे. आज अंतिम दिवस असल्याने अर्ज तपासणीसाठीही मोठी रांग लागण्याची शक्यता आहे. तिन्ही प्रमुख पक्षांनी आजचा दिवस शक्ती प्रदर्शनासाठी निवडल्याने अचलपूर नगराध्यक्ष पदासाठी स्पर्धा चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कोणता पक्ष किती ताकद दाखवतो आणि शेवटी कोणाची दावेदारी मजबूत ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button