अमरावती ते तिवसादरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे

वाहनचालकांना मनस्ताप, अपघाताची शक्यता

तिवसा / 20 जुलै : तिवसा येथून जाणारा अमरावती-नागपूर हा महामार्ग विदर्भातील सर्वाधिक वाहतूक असणारा मार्ग मानला जातो. मात्र या महामार्गावर अमरावती शहरापासून तर वर्धा जिल्ह्यातील चिस्तूरपर्यंत 70 किलोमीटरच्या अंतरात रस्त्याची प्रचंड दुर्दशा झालेली आहे. या भागात ठिकठिकाणी डांबर उखडून महामार्गावर हजारो खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना खड्डे वाचवितांना कमालीची कसरत करावी लागत असून यामुळे अपघातांची शक्यता शक्यता निर्माण झाली आहे. या महामार्ग क्रमांक सहा वर किरकोळ अपघात होण्याच्या घटना तर सातत्याने घडत असून रस्त्यावरील खड्डे हेच त्यामागचे प्रमुख कार आहे.
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गाची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक झाली आहे. रस्त्यावरील मोठाले खड्डे, रस्त्यात गडप झालेले गतिरोधक यामुळे वाहनचालकांचे आणि पादचार्‍यांचे प्राण संकटात आले आहे. या महामार्गावर सतत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ट्रक, बस, प्रवासी वाहने आणि दुचाकींचीही वाहतूक होते. यामुळे रस्त्याची सध्याची दूरवस्था ही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग हा राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीखाली असून आयआरबी कंपनीकडे या महामार्गाचे काम आहे.
परंतु पावसाळ्यापूर्वी महामार्गावर दुरुस्तीचे काम न झाल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. तातडीने महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालकांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष हेमंत बोबडे यांनी केली आहे. तसेच राहटगाव उड्डाणं पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुनील केने, विष्णुपंत खंडारे यांनी निवेदनातून केली आहे.
-दोन दिवसांत खड्डे बुजविणार
पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. अमरावती-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरण आणि बांधकामाला आता जवळपास पंधरा वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता योग्य स्थितीत ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. नांदगाव पेठ ते मोझरीपर्यंत महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम या दोन दिवसात पूर्ण करण्यात येईल, असे आयआरबी कंपनीचे अभियंता प्रविण नागपूरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button