पूर्णा प्रकल्प भरला, सर्व 9 दरवाजे उघडले
प्रती सेकंद 15.94 घ.मी. पाण्याचा विसर्ग

-नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
अमरावती / 19 ऑगस्ट : जिल्ह्यातील चांदुर बाजार तहसिल अंतर्गत विश्रोळी गावातील पूर्णा मध्यम प्रकल्पमध्ये सतत होणार्या पावसामुळे जलसंग्रहण वेगाने वाढत आहे. सकाळी प्रकल्पात पाण्याचे प्रमाण 75.45 टक्क्यांवर पोहोचले होते. मात्र संध्याकाळी परिस्थिती अधिक गंभीर होत असल्यामुळे प्रकल्प प्रशासनाने सर्व 9 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सर्व 9 दरवाजे 50 सेंमी ने उघडण्यात आले आहेत.
सिंचन विभागाच्या माहितीनुसार, पूर्णा प्रकल्पाच्या जलाशयातून दर सेकंदाला 15.94 घनमीटर पाणी पूर्णा नदीमध्ये सोडले जात आहे. विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान झाला आहे आणि नदी दुथडी भरुन वाहत आहे. प्रशासनाने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती आधीच जिल्हा प्रशासनास दिली असून, नदी किनारी राहणार्या सर्व गावकर्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रकल्पातील पाणी पातळीवर अधिकारी सातत्याने नजर ठेवत आहेत आणि आवश्यकतेनुसार बचाव व आरोग्य सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसामुळे प्रकल्प क्षेत्रात पाणी प्रचंड प्रमाणात आले आहे. यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. परिसरातील रहिवासी आणि शेतजमीनसाठी त्यातून धोका निर्माण झाला आहे. नदी किनारी राहणार्या गावकर्यांना घराबाहेर न पडण्याचे आणि प्रशासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रचलित मानकानुसार 31 मेपर्यंत पूर्णा मध्यम प्रकल्पात 76.33% जलसंग्रहण राखणे अपेक्षित आहे. सतत पावसामुळे जलसंग्रहण 75.45% वर पोहोचले आहे, आणि जलस्तर अधिक वाढत असल्याने सुरक्षा कारणास्तव सर्व दरवाजे उघडून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.




