पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला दादासाहेब गवई यांचा धगधगता इतिहास

विक्रमशीला पॉलिटेक्निकची दादासाहेब गवई स्मारकाला भेट

अमरावती /10 फेब्रुवारी : दारापूर येथील विक्रमशीला पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी अमरावती विद्यापीठ परिसरात नव्याने साकारण्यात आलेल्या स्व. रा. सू. ऊर्फ दादासाहेब गवई यांच्या भव्य स्मारकाला सदिच्छा भेट दिली. पुस्तकी ज्ञानाला सामाजिक जाणीवेची जोड देण्यासाठी आणि भावी अभियंत्यांमध्ये थोर नेत्यांचे आदर्श रुजवण्यासाठी या विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
माजी राज्यपाल आणि विदर्भाच्या शैक्षणिक प्रगतीचे शिल्पकार दादासाहेब गवई यांचे हे स्मारक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि इतिहासाचा एक दुर्मिळ संगम आहे. विद्यार्थ्यांनी या भेटीदरम्यान स्मारकातील प्रत्येक दालनाला भेट देऊन दादासाहेबांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे बारकावे जाणून घेतले.
एआय गॅलरी आणि डिजिटल प्रदर्शनाने वेधले लक्ष- या भेटीचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे स्मारकातील अत्याधुनिक एआय आधारित गॅलरी. या स्मारकात दादासाहेबांचा जीवनप्रवास 16 डिजिटल वॉल डिस्प्ले आणि ऑडिओ-व्हिज्युअल किओस्कच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा अनुभव घेत असतानाच दादासाहेबांनी दीक्षाभूमीच्या विकासासाठी आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या क्रांतीची माहिती घेतली. 15 फुटी उंच कांस्य पुतळ्यासमोर विद्यार्थ्यांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना धम्मदीप गवई यांनी दादासाहेबांच्या ’व्हिजन’वर प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले की, दादासाहेब गवई यांनी नेहमीच आधुनिक विचारांचा पुरस्कार केला.

संबंधित बातम्या

Back to top button