शहरातील सर्व हॉटेल आणि लॉजवर पोलिसांचा वॉच

रात्रभर पोलिसांची तपास मोहीम संशयितांची चौकशी

* अनेक नोंदी व कागदपत्रे जप्त

अमरावती/ 12 नोव्हेंबर – अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस विभागाने मंगळवारी (11 नोव्हेंबर) रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत व्यापक तपास मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व हॉटेल, लॉज, अतिथिगृह तसेच सार्वजनिक ठिकाणांची सखोल तपासणी करण्यात आली. एकाच वेळी शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कोंबिंग मोहीम आणि नाकाबंदी सुरू करून संशयास्पद व्यक्ती व वाहनांवर देखरेख ठेवण्यात आली. ही मोहीम पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या सूचनेनुसार पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, निरीक्षक आणि शेकडो पोलिस कर्मचार्‍यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत चाललेल्या या धडक कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हॉटेल व लॉजमधील नोंदवही, आगमन-वहन रजिस्टर, पाहुण्यांची माहिती आणि ओळखपत्रांची तपासणी केली. काही ठिकाणी संशयास्पद माहिती आढळल्याने तेथील नोंदी आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये 1,246 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात 73 वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय पोलिसांनी 6 निगराणी गुन्हेगार आणि 4 तडीपार आरोपींची तपासणी केली. तसेच बेकायदेशीर जुगार खेळांवर चालणार्‍या तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. प्रतिबंधक कायद्यानुसार दोन कारवाया करण्यात आल्या. शहरातील वाढत्या गुन्हेगारी हालचालींवर आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिस विभाग वेळोवेळी अशा मोहिमा राबवत असतो. सणासुदीचा काळ आणि आगामी निवडणुकीचा विचार करता पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. या कारवाईमुळे संशयित प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरवासीयांकडून पोलिसांच्या या तत्परतेचे स्वागत करण्यात येत आहे. पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या तपास मोहिमा आणि कोंबिंग ऑपरेशन पुढेही नियमितपणे सुरू राहतील, जेणेकरून शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राखली जाईल.

संबंधित बातम्या

Back to top button