‘हत्या आणि एके-47’ ची सूचना अन पोलिसांची तारांबळ

112 वरील खोट्या कॉलने खळबळ

-वरिष्ठांसह लवाजमा पोहोचला अकबर नगरात
-कॉल करणार्‍याने ब्लेडने स्वत:वर केले वार
अमरावती / 19 जून: ‘साहेब, येथे अकबर नगरात 18 वर्षाच्या युवकाची हत्या झाली आहे आणि एके-47 सुद्धा आहे’ अशी सूचना देणारा कॉल डायल-112 वर आला आणि त्यानंतर खळबळ उडून शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ झाली. नागपूरी गेट पोलिसांसह आयुक्तालयातील मोठा फौजफाटा अकबर नगरात पोहोचला मात्र तेथे काहीच झाल्याचे आढळून आले नाही. चौकशीअंती कुणीतरी कॉल करुन खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. तद्पश्चात पोलिसांनी खोटा कॉल करणार्‍याला शोधूनही काढले. तेव्हा त्याने ब्लेडने स्वत:वरच वार करुन जखमी करुन घेतले.
हा संपूर्ण प्रकार बुधवारी, 18 जून रोजी सायंकाळी उशिरा घडला. डायल 112 या पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करुन सूचना देण्यात आली की, नागपूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकबर नगरात एका 18 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी आरोपींजवळ एके-47 सुद्धा आहे. या सूचनेने पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. वरिष्ठांना याबाबत सूचित करण्यात आले. त्यानंतर तात्काळ नागपूरी गेट पोलिसांसोबतच पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेची दोन्ही पथके, दंगा नियंत्रण पथक यांच्यासह सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ अधिकार्‍यांनी अकबर नगरात धाव घेतली. पण तेथे सर्वत्र शांतता दिसून आली.
पोलिसांनी संपूर्ण परिसरात कसून तपास करुन स्थानिकांकडे चौकशी केली. तेव्हा अशाप्रकारची कोणतीच घटना या भागात घडली नसल्याचे सांगितले गेले. कोणीतरी 112 वर कॉल करुन खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर खोटा कॉल करणार्‍या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरु केला तेव्हा अकबर नगर भागातच राहणार्‍या आसिफ खान अजीम खान या 33 वर्षीय युवकाने हा खोडसाळपणा केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. पोलिस जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्याने ब्लेडने हातावर व पायावर वार करुन स्वत:ला जखमी केल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपी आसिफ खान हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्याला तंबी दिली आणि सोडून दिले.

संबंधित बातम्या

Back to top button