पोलिसांनी केले 257 शस्त्रे जमा, 489 जणांवर कारवाई
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांची कडक मोहीम

अमरावती /19 नोव्हेंबर – जिल्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका जवळ येत असताना ग्रामीण पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेची शिस्त अबाधित ठेवण्यासाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा अनुशासनभंग, दहशत किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व थानेदारांना तयारी कमालीची ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शस्त्रधारकांची तपासणी, परवाना बंदुका जमा करणे आणि गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींवर देखरेख वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्यातील विविध थाने क्षेत्रांमध्ये एकूण 286 शस्त्र परवाना धारकांची माहिती पडताळण्यात आली. यापैकी 257 जणांकडील बंदुका संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये जमा करून घेण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात या शस्त्रांचा गैरवापर होऊ नये, भांडणे, धमक्या किंवा जातीय तणावाच्या घटना उद्भवू नयेत यासाठी शस्त्रे तात्पुरती जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. उर्वरित 19 बंदुका बँक सुरक्षा रक्षकांकडे कार्यनिमित्त असल्याने त्यांना जमा न करण्यास सवलत देण्यात आली आहे. मात्र या शस्त्रांचीही नियमित तपासणी करून सुरक्षा रक्षकांच्या तैनातीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिकार्यांकडून देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर शांततापूर्ण वातावरण राखणे हे पोलिस प्रशासनापुढील प्रमुख आव्हान असते. अमरावती जिल्यातील 10 नगर परिषद आणि 2 नगर पंचायतांच्या निवडणुकीमुळे येत्या काही दिवसांत प्रचाराची धग वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संभाव्य गुन्हेगारांवर कारवाईचा मोर्चा आणखी तीव्र केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी 18 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत सर्व उपविभागीय अधिकारी व थानेदारांसोबत निवडणूक सुरक्षेच्या तयारीवर चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 489 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ‘सीआरपीसी’च्या कलमानुसार नोटिसा बजावणे, जामीनबंदीची कारवाई, नियमित हजेरी लावण्याचे आदेश आणि काहींच्या हालचालींवर विशेष नजर ठेवणे या उपायांचा समावेश आहे. पूर्वी गोंधळ, मारामार्या, बेकायदेशीर जमाव किंवा शस्त्रबाळगण्याचे प्रकार करणार्या व्यक्तींवर कारवाई करून त्यांना नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. निवडणूक काळात विविध राजकीय गटांमध्ये वाद वाढू नयेत, अवैध शस्त्रे किंवा मद्याचे वितरण रोखले जावे यासाठी गस्त वाढविण्यात आली असून ग्रामीण पट्ट्यातील महत्त्वाच्या चौकात नाके तपासणी सुरू आहे. ग्रामीण पोलिसांचे अधिकारी सांगतात की, निवडणुका शांततेत व्हाव्यात हा मुख्य हेतू आहे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणू शकणार्या घटकांवर सतत नजर ठेवली जात आहे. गावागावांत बैठकांचे आयोजन करून पोलिस प्रशासनाने नागरिकांना निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत प्रचारफलक, ध्वनिक्षेपकांचा वापर, पैशांचे वाटप किंवा धमकावणे अशा प्रकारांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. जिल्यातील ग्रामीण भागात सुरू असलेली ही मोहिम निवडणुका पारदर्शक आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आगामी काही दिवसांत पोलिसांची गस्त, तपासणी व देखरेख आणखी वाढविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.




