बालीकेवर अत्याचार करणार्या आरोपीची पोलिसांकडून वरात
नराधमाचा चेहरा शहवासीयांसमोर आणला

-घटनेनंतर दोन महिन्यांनी अटक
अमरावती / 22 जुलै : दर्यापूर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून पसार झालेल्या 26 वर्षीय नराधमाला दर्यापूर पोलिसांनी दोन महिन्यानंतर अटक केली. या नराधमाचा चेहरा आणि दुष्कृत्य सर्वसामान्य दर्यापूरवासीयांच्या समोर यावे, यासाठी पोलिसांनी त्याची अक्षरश: पोलिस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत वरातच काढली. नटवर कैलाससिंग तोमर (26, रा. लेहगाव, दर्यापूर) असे या आरोपीचे नाव आहे.
नटवरने तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले होते. पिडितेच्या तक्रारीवरुन दर्यापूर पोलिसांनी त्याच्यावर 12 मे 2025 रोजी पोस्को कायद्याअंतर्गत बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तेव्हापासून आरोपी नटवर तोमर हा फरार होता. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी शोधमोहिम हाती घेतली होती. अनेकदा पोलिस त्याच्याजवळ पोहोचलेसुद्धा पण वेळोवेळी पोलिसांना चकमा देवून पसार होण्यात तो यशस्वी होत होता. संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिसांना नटवरच्या गुन्ह्याची माहिती आणि त्याचे छायाचित्र व वर्णण पाठविले होते.
दरम्यान नटवर तोमर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे दडून बसल्याची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांचे एक पथक तेथे पोहोचले आणि नटवरला तब्बल दोन महिन्यांनंतर अटक करण्यात आली. त्याला दर्यापूर येथे आणल्यानंतर न्यायालयात हजर करावयाचे होते. अल्पवयीन मुलीवर अत्याचारासारखा गंभीर गुन्हा करणार्या या नराधमाचा चेहरा सर्वसामान्य दर्यापूरवासीयांच्या समोर यावा. अशा आरोपींबद्दल समाजात असलेली भीड चेपावी आणि लोकांनी भविष्यात त्याच्यापासून सावध राहावे या उद्देशाने न्यायालयात नेताना नटवरची पोलिस स्टेशनपासून तर न्यायालयापर्यंत मुख्य रस्त्याने अक्षरश: पायी वरातच काढली. यावेळी नटवरच्या चेहर्यावरील लज्जेचे भाव स्पष्ट दिसत होते. सर्वसामान्य नागरिकांकडूनही दुष्कृत्यासाठी त्याला शिव्याशाप दिले जात होते. ही कारवाई ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अभय चौथनकर, पीएसआय नम्रता राठोड, रोहित सोनटक्के व अन्य पोलीस कर्मचार्यांनी केली.




