शांततेत मतदानासाठी पोलीस सज्ज; चोख बंदोबस्त तैनात

पासेस देऊन पोलीस जवानांवर सोपवली जबाबदारी

* पोलीस मैदानात सीपी राकेश ओला यांनी कर्मचार्‍यांना दिल्या सूचना
* मनपा क्षेत्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

अमरावती /14 जानेवारी : महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या, गुरुवार 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. शांततामय आणि भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी शहर पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील 7 निवडणूक झोनअंतर्गत येणार्‍या 22 प्रभागांमधील 231 इमारतींमधील 805 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण झाले आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या उपस्थितीत 13 जानेवारी रोजी दुपारी पोलीस मैदानावर सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना ’ड्यूटी पास’ देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सर्व जवान व होमगार्डना आवश्यक सूचना दिल्या.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 37 ’सेक्टर पेट्रोलिंग’ टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत, ज्या मतदानाच्या दिवशी सतत गस्त घालतील. 22 प्रभागांमध्ये 44 क्षेत्रीय अधिकार्‍यांसोबत 44 पोलीस जवान सतत पेट्रोलिंग करणार आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आणि गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची (क्राईम ब्रांच) 8 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. सोशल मीडियावर पसरणार्‍या अफवा, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि संदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलीस सक्रिय राहतील. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची 8 पेट्रोलिंग पथके आरसीपी (ठउझ) आणि क्यूआरटी (टठढ) सह तैनात राहतील.
प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन विशेष पथके-निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार्‍यांवर तातडीने कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) दोन पोलीस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक तैनात राहतील, जे निवडणुकीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देतील. संपूर्ण मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असेल. नियंत्रण कक्षात पाच स्ट्रायकिंग फोर्स आणि 69 पोलीस जवान राखीव ठेवण्यात आले आहेत.
गुन्हेगारांवर कडक कारवाई-निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि अवैध व्यावसायिकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 737 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच 358 शस्त्र परवानाधारकांपैकी 289 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत, तर 78 परवानाधारकांना सूट देण्यात आली आहे. यापैकी एक परवाना रद्द करण्यात आला असून चार शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

असा असेल बंदोबस्त

पोलीस उपायुक्त :                                 3
सहायक पोलीस आयुक्त :                       7
पोलीस निरीक्षक :                                 31
सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक :          91
पोलीस कर्मचारी :                                1650
होमगार्ड :                                           900
एसआरपीएफ (SRPF) कंपनी :             1
आरसीपी (RCP) पथक :                        3
क्यूआरटी (QRT) पथक :                        4

संबंधित बातम्या

Back to top button