कवी गजानन मते यांना लोककवी शंकर बढे पुरस्कार जाहीर

अमरावती /12 जानेवारी – लोकसाहित्य परिषद हिंगणघाटच्या वतीने दिला जाणारा स्व. प्रा रवींद्र ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त लोककवी शंकर बडे वर्हाडी मायबोली पुरस्कार यावर्षी परतवाडा येथील संवेदनशील व शेतकर्यांच्या व्यथा,वेदना आपल्या वर्हाडी कवितेतून महाराष्ट्रभर मांडणारे, वर्हाडी बोलीचा गोडवा देश विदेशात पोचविणारे सुप्रसिद्ध कवी गजानन मते यांना जाहीर झाला आहे.
अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, सन्मान वस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून साहित्य क्षेत्रात हा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. गेल्या तीस वर्षापासून लोक साहित्य परिषदेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. येत्या 17 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता हरीओम सभागृह हिंगणघाट येथे आयोजीलेल्या सन्मान सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.याचवेळी ’ एक रात्र कवितेची ’ या विनोद व प्रबोधनाने ओतप्रोत भरलेल्या काव्य मैफिलीचे आयोजन लोकसाहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील दिग्गज कवी गझलकारा ममता सपकाळ पुणे, कवयित्री गुंजन पाटील जळगांव, हास्य कवी प्रशांत भोंडे अकोला, गजानन मते परतवाडा, गझलकार गोपाल मापारी बुलढाणा यामध्ये सहभागी होणार आहे. नुकतेच विदर्भ साहित्य संघ व अंभोरा देवस्थान ट्रस्ट ,कुही मांडळ नागपूर यांच्या वतीने दिला जाणारा आद्यकवी मुकुंदराज स्वामी साहित्य गौरव पुरस्काराने सुद्धा मते यांना सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात गजानन मते यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




