पिंपळखुट्यातील जुगार अड्ड्यावर मोर्शी पोलिसांची धाड
चौघांना अटक, 10.61 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोर्शी / 25 जुलै : मोर्शी येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाने अवैध व्यवसाय व जुगार अड्ड्यांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या वरली, जुगार व दारु अड्ड्यावर छापे मारण्याची कारवाई करण्यात येत आहे. तालुक्यातील पिंपळखुटा मोठा येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी छापा मारुन जुगार खेळताना चौघांना अटक केली आणि त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह सुमारे 10 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
मोर्शी येथून जवळच असलेल्या पिंपळखुटा (मोठा) येथील 70 गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या मागे जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पथकाने सापळा रचून या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. जुगार खेळत असलेले शेख शाकीर शेख वजीर (43), अनिस शेख युनूस शेख (28), सतीश प्रभाकर राणे (43(), योगेश चंद्रकांत चरडे (30) या चार आरोपींना रंगेहात अटक केली.
त्यांच्या ताब्यातून 4550 रुपये रोख पांढर्या रंगाची महिंद्रा कंपनीची फोर व्हीलर गाडी क्र. एम एच 27/ए आर 1162 आणि अन्य साहित्य असा एकूण 10 लाख 61 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड पडताच काही आरोपींनी मात्र घटनास्थळावरून पलायन केले. त्यांचा शोध मोर्शी पोलीस घेत आहे. या अगोदर पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीत चोरी छुपे सुरू असलेल्या वरली मटक्याचा धंद्यावर मोर्शी पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांचे नेतृत्वात उपनिरीक्षक आकाश शिवणकर, तुषार चव्हाण, अंमलदार छत्रपती करपते, स्वप्निल बायस्कर यांनी केली.




