फायटोफ्थोराच्या प्रादुर्भावाचा संत्रा उत्पादकांना मोठा फटका

अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नूकसान

-आ. सुलभा खोडके यांनी वेधले लक्ष
-नूकसान भरपाई देण्याची अधिवेशनात मागणी
अमरावती /4 जुलै: अमरावती जिल्ह्यात फायटोफ्थोरा या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाने संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या मे महिन्यापासूनचा अवकाळी पावसामुळे संत्रा लागवड क्षेत्रात ओलाव्यामुळे फायटोफ्थोरा जिवाणूंची वाढ होऊन जमीनसुद्धा बाधित झाली. त्याचे गंभीर परिणाम या भागात दिसून येत आहे. हा गंभीर मुद्यासंदर्भाने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन संकटात सापडलेल्या संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
या कठिण परिस्थितीत शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील संत्रा लागवड क्षेत्रात कृषी विभागामार्फत चौकशी व पंचनामे कधी करणार? असा प्रश्न आमदार सुलभा संजय खोडके यांनी विचारला. शुक्रवार, 4 जुलैच्या कामकाजा दरम्यान प्रशोत्तराच्या तासांमध्ये सुलभा खोडके यांनी अमरावती जिल्ह्यातील संत्रा पिकांवर फायटोफ्थोरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने संत्रा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे आपल्या सविस्तर निवेदनातून शासनाच्या लक्षात आणून दिले. अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदुर बाजार भागात संत्रा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शेतकर्‍यांना तीन वर्षातून एकदा चांगला संत्रा होत असल्याने शेतकर्‍यांना दरवर्षी उत्तमरीत्या संत्रा झाडांचे संगोपन करून ती जागवावी लागतात, असे खोडके यांनी सांगितले.
मात्र सध्या संत्रा पिकांवर फायटोफ्थोरा नामक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संत्रा पिके संकटात सापडली आहे. या रोगाची लक्षणे एवढी गंभीर आहे, कि संत्राफळे सडण्याबरोबरच यामध्ये पिकांच्या मुळाशी जिवाणू तयार होऊन आधी खोडं कुजत आहे. नंतर मुळे सुकून झाडे मरतात, अशी माहिती त्यांनी दिली. जमिनीमध्ये डिंकासारखा प्रादुर्भाव तयार होतो. जेव्हा ओलिताकरिता पाणी शेतात सोडले जाते, तेव्हा पटपाणीमुळे हे जिवाणू बरेच दिवस जिवंत राहतात. नुकत्याच मे महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे संत्रालागवड क्षेत्रात फायटोफथोराचे जिवाणू वाढले असल्याने संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असे खोडके यांनी सभागृहाला अवगत करुन दिले.
अमरावती जिल्ह्यातील संत्रा पिकांना फायटोफ्थोरा रोगांमुळे फटका बसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कृषी विभागाने अजूनही पंचनामे न केल्याने संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक भरपाईपासून वंचित आहे. याबाबत शासनाने एक समिती स्थापन करून कृषी विभागामार्फत चौकशी करावी व अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार सुलभा खोडके यांनी केली. यावर शासनाच्यावतीने उत्तर देतांना कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सांगितले कि, फायटोफ्थोरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा पिकांचे मोठे नुकसान होते, हे खरे असले तरी याबाबत अजूनपर्यंत कुठली तक्रार प्राप्त झाली नाही. ज्याभागात असे घडले असेल त्याभागात निश्चितपणे मदत करण्यात येईल.

संबंधित बातम्या

Back to top button