दीराकडून वहिनीवर शारीरिक अत्याचार
धमकावून स्थापित केले संबंध

अमरावती / 29 जून: मोठ्या भावाच्या अपरोक्ष लहान भावाने आपल्या वहिनीला मारण्याची धमकी देवून सतत वीस दिवस शारीरिक अत्याचार केल्याची घटना दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावात उघडकीस आली आहे. पिडित महिलेच्या तक्रारीवरुन येवदा पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी 38 वर्षीय दिर आणि पिडिता त्याची 26 वर्षीय वहिनी एकाच घरात राहतात. दिराचे लग्न झालेले नाही. आरोपीची त्याच्या वहिनीवर वाईट नजर होती. 25 एप्रिल 2025 रोजी घरात कोणीच नसताना आरोपीने महिलेवर बळजबरीचा प्रयत्न केला. वहिनी माझे लग्न जुळत नाही, मी तणावात आहे असे म्हणून त्याने जबरदस्तीने पिडितेशी शारीरिक संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पिडितेने आरोपीला लोटून देत कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. त्या रात्री पती येईपर्यंत ती घराच्या बाहेरच राहीली. तेव्हापासून आरोपीपासून सावध राहून पिडितेने स्वत:चा बचाव केला.
मात्र 14 मे रोजी रात्री पिडितेचे पती घराबाहेर गेले असता आरोपीने आपला डाव साधला आणि आपल्या वहिनीवर बळजबरीने बलात्कार केला. कुणाला याबाबत सांगितले तर मारण्याची धमकी आरोपीने महिलेला दिली होती. त्यामुळे तिने याबाबत कुणाजवळही वाच्यता केली नाही. त्यानंतर धमकावून आरोपीने महिलेवर सतत लैंगिक अत्याचार केला. 6 जूनपर्यंत त्याच्याकडून हा प्रकार सुरुच होता. अखेर या अत्याचाराला कंटाळून पिडितेने आपबीती पतीला सांगितली. त्यानंतर पतीसह महिलेने येवदा पोलिस ठाण्यात पोहोचून दिराविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याआधारे येवदा पोलिसांनी आरोपी दिराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.




