एसटी कर्मचार्यांची देणी फेडा अन्यथा उभ्या महाराष्ट्रात चक्काजाम
खा. अरविंद सावंत यांचा इशारा

-दिवाळीपूर्वी एसटी कर्मचार्यांचे आंदोलन
दर्यापूर / 18 सप्टेंबर : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या भरगच्च बैठकीत खासदार अरविंद सावंत यांनी दिवाळीपूर्वी शासनाने एसटी कर्मचार्यांची थकीत देणी भागविली नाहीत, तर राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी असून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महामंडळ आज तोट्यात आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी आतातरी शहाणे व्हावे व एकनिष्ठ राहून लढ्याची तयारी करावी, असे ठाम आवाहन सावंत यांनी केले.
दर्यापूर येथे आज गुरुवारी ही एसटी कामगार सेनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पाडली. त्यात राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. राज्य शासनाकडे एसटी महामंडळाचे तब्बल 6 हजार कोटी रुपये येणे आहे. या थकबाकीमुळे कर्मचार्यांचे वेतन, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता इत्यादी अनेक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी देयके मिळाली नाही, तर माझी एसटी, माझा महाराष्ट्र या आंदोलनाच्या हाकेला हजारो कर्मचारी प्रतिसाद देतील, असा विश्वास व्यक्त करत सावंत म्हणाले की, कर्मचारीच या महामंडळाचे बळ आहेत. जगेन तर भगव्याबरोबर आणि मरेन तर भगव्यासाठी ही शपथ घ्या.
आपल्या भाषणात त्यांनी भाजपाच्या विलीनीकरण मागणीवर जोरदार टीका केली. तत्कालीन भाजप नेते व काही सहकारी एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी करत कर्मचार्यांना भावनिक बनवत होते. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आंदोलनात नाचत होते, तर सदावर्ते अन्यायाच्या नावाखाली कर्मचार्यांची दिशाभूल करत होते. मात्र प्रत्यक्षात विलीनीकरणाच्या दिशेने एक पाऊलही पडले नाही. उलटपक्षी, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये दिवाकर रावते व अनिल परब यांनीच ऐतिहासिक वेतनवाढ, नवीन धोरणे व 1 हजार कोटींचा निधी आणून कर्मचार्यांना दिलासा दिला, असे ते म्हणाले.
या बैठकीत खासदार अरविंद सावंत यांचा नुकताच मिळालेला ‘संसद रत्न’ पुरस्काराबद्दल कार्याध्यक्ष प्रदीप धुरंधर व सरचिटणीस हिरन रेडकर यांनी विशेष सत्कार केला. त्याचप्रमाणे 1989 पासून एकनिष्ठ राहून सेवानिवृत्त झालेल्या अॅड. लक्ष्मण विशे, राजाभाऊ करंगुटकर, हेमचंद्र गुप्ते, प्रसाद मोरे, वासुदेव जाधव, राजन पाटील, सुधाकर घायवटे, बाळासाहेब राणे, नारायण उतेकर, नारायण निलवे या ज्येष्ठांचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
चांदा ते बांदा प्रांतातील महिला-पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकारिणी बैठकीत सहभागी झाले. सावंत यांच्या दमदार भाषणामुळे उपस्थितांना नवचैतन्य मिळाले असून, जिल्हा-जिल्ह्यातील कार्यकर्ते आंदोलनाच्या मानसिकतेसह परतल्याचे दिसून आले. दिवाळीपूर्वी देणी भागवली नाहीत, तर भगवा झेंडा घेऊन उभे ठाकणार्या कर्मचार्यांच्या आंदोलनाची जुमान करण्याशिवाय शासनाकडे पर्याय राहणार नाही.




