ग्रामीण पोलीस दलातील अनुकंपा नियुक्तीचा मार्ग मोकळा
गट-ड संवर्गातील चाळीस पदे पुन्हा कार्यान्वित

* प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कुटुंबांना दिलासा
अमरावती / 10 फेब्रुवारी – राज्य पोलीस दलाच्या प्रशासकीय कामकाजात मोलाचा वाटा उचलणार्या ’गट ड’ संवर्गातील कर्मचार्यांच्या पदभरतीबाबत महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून निष्क्रिय करण्यात आलेली या संवर्गातील 40 पदे आता पुन्हा जिवंत करण्यात आली असून यामुळे अमरावती ग्रामीण पोलीस दलासह राज्यातील विविध पोलीस घटकांमधील अनुकंपा नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
जुलै आणि ऑगस्ट 2025 च्या सुधारित धोरणानुसार, पोलीस महासंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील ही पदे आता केवळ वारसा हक्काने नोकरी मिळणार्या उमेदवारांसाठी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी दोन पदे बहाल करण्यात आल्याने जिल्ह्यातील गरजू कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून प्रलंबित नियुक्त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. हा निर्णय घेताना शासनाने काही ताठर अटी व शर्ती देखील लागू केल्या आहेत. या पुनरुज्जीवित पदांवर केवळ अनुकंपा तत्त्वावरच भरती करता येईल. जर या पदावर नियुक्त झालेला कर्मचारी भविष्यात पदोन्नत झाला किंवा सेवानिवृत्त झाला, तर ते पद कायमस्वरूपी रिक्त मानले जाईल आणि ते पुन्हा भरले जाणार नाही. राज्यातील एकूण 20 विविध पोलीस घटकांमध्ये ही 40 पदे विभागून देण्यात आली आहेत. या निर्णयामुळे पोलीस दलातील रिक्त पदांचा प्रश्न अंशतः सुटण्यास मदत होणार असून, कर्तव्यावर असताना निधन झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. गृह विभागाने 9 फेब्रुवारी रोजी घेतलेला हा निर्णय पोलीस प्रशासनातील मानवी दृष्टिकोन अधोरेखित करणारा ठरला आहे.
अमरावतीला 2 पदे प्राप्त
महाराष्ट्र गृह विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरात एकूण 40 पदे पुन्हा कार्यान्वित झाली असून त्यातील 2 पदे अमरावती ग्रामीण पोलीस दलाला मिळाली आहेत. या पदांवर केवळ वारसा हक्कानेच नियुक्ती देता येईल. कर्मचारी निवृत्त झाल्यावर हे पद आपोआप संपुष्टात येईल, हा यातील सर्वात महत्त्वाचा तांत्रिक बदल आहे.




