मुंबई विमानतळावर प्रवाशांचा संताप

अमरावती विमान पुन्हा ऐनवेळी रद्द

* धुक्याचे कारण दाखवून विमान उशिरा उडाले

अमरावती / 7 नोव्हेंबर – अमरावती-मुंबई विमानसेवेला प्रवाशांकडून सातत्याने उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही, विमानतळ प्रशासनाकडून वारंवार तांत्रिक कारणे व धुक्याचा हवाला देत फ्लाइट रद्द करण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. 5 नोव्हेंबर रोजी तर मुंबई विमानतळावरच प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला. 3 नोव्हेंबर रोजी बेलोरा विमानतळावर धुके असल्याचे कारण देत अमरावती-मुंबई फ्लाइट ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच 5 नोव्हेंबरला मुंबईहून अमरावतीला येणारी फ्लाइट पुन्हा रद्द करण्याचा संदेश प्रवाशांच्या मोबाईलवर आला. अचानक संदेश मिळताच प्रवासी संतप्त झाले आणि मुंबई विमानतळावर मोठी धांदल उडाली. काही प्रवाशांनी ‘विमान अमरावतीकडे न पाठवल्यास आंदोलन करू’, असा इशारा दिला. वाढत्या तणावामुळे अखेर सकाळी 7.05 वाजता उड्डाण करायचे असलेले विमान तब्बल 9.34 वाजता अमरावतीकडे रवाना करण्यात आले. हे विमान 11.30 वाजता अमरावतीत उतरले. दरम्यान, सकाळी 6 वाजल्यापासून प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला. विमानतळ प्रशासनाने ‘अमरावतीत धुके असल्यामुळे लँडिंग शक्य नाही’ असा दावा केला; मात्र त्या वेळेस हवामान पूर्णपणे स्वच्छ असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. ही माहिती उद्योगपती विरेंद्र लढ्ढा यांनी दिली.
अमरावती विमानतळ बंद करण्याचा कट?-या उड्डाणात 58 प्रवासी होते आणि विमान पूर्ण भरलेले होते. अमरावती-मुंबई मार्गावर सुरू झाल्यापासून या सेवेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून व्यापारी, उद्योगपती, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर या सेवेतून प्रवास करतात. मात्र, कधी ‘धुके’, कधी ‘इंधन उपलब्ध नाही’, असे कारण देत वारंवार फ्लाइट रद्द केल्या जात असल्याने मुद्दामहून अमरावती विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रवाशांची संख्या कमी होत असल्याचा दाखला देत सेवा बंद करण्याचा डाव असल्याचेही बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button