पांढुर्ण्यात पारंपारिक गोटमार : 500 हून अधिक जखमी, 5 गंभीर

जाम नदीपात्रात दगडांचा पाउस

-प्रचंड गर्दीत परंपरेची पुनरावृत्ती
-दोन्ही पक्षाच्या संमतीने ध्वज मंदिरामध्ये
वरुड / 24 जुलै : मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा येथे शतकानुशतकांची परंपरा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोटमार जत्रेला यंदाही रक्तरंजित वळण लागले. रविवारी सकाळी सूर्योदयासोबत सुरू झालेला दगडांचा वर्षाव दुपारभर सुरू राहिला आणि संध्याकाळी सहा-साडेसहाला त्याने उच्चांक गाठला. या हिंसक परंपरेत 500 हून अधिक जण जखमी झाले, तर पाच जण गंभीर जखमी अवस्थेत नागपूरला हलविण्यात आले.
गोटमारीदरम्यान भडकलेले वातावरण संध्याकाळी सात वाजता ओसरले, जेव्हा दोन्ही पक्षांच्या संमतीने झेंडा नदीपात्रातून उचलून माँ चंडिकेच्या मंदिरात नेण्यात आला आणि पूजेअंती यात्रेची सांगता झाली. गोटमारीचा इतिहासही तेवढाच गूढ आणि रक्तरंजित आहे. काही मान्यता सांगतात की, पूर्वी पेंढरीकरांनी शह देण्यासाठी ही दगडफेक सुरू केली, तर काहींच्या मते सावरगाव व पांढुर्ण्यातील युवक-युवतीच्या विवादित प्रेमविवाहातून या प्रथेची सुरुवात झाली. या घटनेत वधूचाही बळी गेला होता. त्या दोघांची समाधी आजही चंडिकामातेच्या मंदिराजवळ आहे, आणि त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही गोटमार चालते, असे मानले जाते.
300 वर्षांहून अधिक जूनी परंपरा असलेली ही गोटमार आज पिढ्यान्पिढ्या शेतकरी, शेतमजूर, अशिक्षित नागरिकांमध्ये आंधळ्या श्रद्धेच्या रूपाने टिकून राहिली आहे. असा समज आहे की जर कोणी देवतेच्या नावाने गोटा मारला नाही तर त्याची इच्छा पूर्ण होत नाही. परिणामी प्रत्येक भक्त, अगदी मद्यप्राशन केलेले तरुणदेखील यात वेड्यासारखे सहभागी होतात. दुर्दैवाने, दरवर्षी शेकडो लोक रक्तबंबाळ होतात, काहींचे प्राण जातात, तर अनेकजण कायमच्या अपंगत्वाला सामोरे जातात.
यावर्षी मात्र जिल्हा प्रशासनाने नव्या उपाययोजना राबवल्या. जिल्हाधिकारी निलगनी अग्निहोत्री यांच्या आदेशाने नागपूर व अमरावतीसह सिवनी व बैतूल जिल्ह्यांतून वैद्यकीय पथके मागवली गेली. रुग्णवाहिकांची संख्या दुप्पट, कॉरिडॉरमार्फत तात्काळ रुग्णालयात पोहोचवणी आणि पोलिस अधीक्षक संदुरसिंग कनेश यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 600 फौजफाटा तैनात करून शिस्त राखण्याचा प्रयत्न झाला.
गोटमार पाहण्यासाठी यंदा बारा हजारांहून अधिक भाविक आणि पर्यटक पांढुर्ण्यात जमले होते. महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, यवतमाळसारख्या जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली. पर्वासोबतच गुजरी बाजार, मनोरंजनाची दुकाने, मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल्स यांनी शहर गजबजले. माँ चंडिकेच्या मंदिरात पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. अखेरीस संध्याकाळी सात वाजता संघर्ष थांबला. झेंडा चंडीमातेच्या मंदिरात नेऊन पूजा झाल्याने वातावरण प्रसन्न झाले; पण दगडांचा पाऊस मात्र शेकडो कुटुंबांसाठी डोळ्यात पाणी आणून गेला.

संबंधित बातम्या

Back to top button