अस्वच्छता निर्मूलनासाठी देखरेख समिती गठीत
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेत्यांसह एकूण 13 जणांचा समावेश

अमरावती/11 मार्च – शहरातील अस्वच्छतेविरुध्द जनतेचा असंतोष लक्षात घेता महापालिकेने 28 फेब्रुवारी रोजी एका विशेष आमसभेेचे आयोजन केले होते. तब्बल 12 तास जवळपास सर्व नवनिवार्चित व स्वीकृत नगरसेवकांनी प्रशासनाविरुध्द प्रचंड तक्रारी केल्या. शहरातील अस्वच्छतेने गंभीर स्वरुप धारण केले असून स्वच्छता ठेकेदारावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. असा आमसभेचा सुर होता.
नगरसेवकांच्या व नागरीकांच्या भावना लक्षात घेवून महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी स्वच्छता ठेकेदाराच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी व प्रशासनावर अंकुश राहण्यासाठी एका सर्वपक्षीय समितीचे गठण तयार करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानूसार आज गटनेत्यांनी आपल्या पक्षातील एका नगरसेवकाला संधी देत तब्बल 13 नगरसेवक तथा पदाधिकार्यांची समिती जाहीर करण्यात आलेली आहे.
या समितीत महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर युवा स्वाभिमानचे गटनेते नाना आमले, नगरसेवक प्रशांत वानखडे, भाजपा गटनेते चेतन गावंडे, स्विकृत नगरसेवक अॅड. प्रशांत देशपांडे, शिवसेनेचे गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, स्वीकृत नगरसेवक दिनेश बुब, काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर स्वीकृत नगरसेवक मिलींद चिमोटे, एमआयएम चे गटनेते अब्दुल शेख हमीद, नगरसेवक सय्यद राशीद अली यांचा समावेश आहे. गटनेते व पक्षातील एक नगरसेवक अशी या समितीची रचना आहे. ही समिती अमरावती महानगराची स्वच्छता राखण्यासाठी देण्यात आलेल्या कोणार्क कंपनीच्या ठेक्यावर लक्ष ठेवेल तसेच प्रशासनाची भूमिकाही निश्चित करेल. सर्वपक्षीय समिती स्थापन झाल्यामुळे शहराची जबाबदारी संपूर्ण समितीने घेतली असून राजकीय मतभेद दुर सारून शहर विकासासाठी आमसभेतून झालेला हा निर्णय अत्यंत अभिनंदनीय असल्याची जनतेची भावना आहे.




