200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर
अंबादेवी व एकवीरा देवी मंदिर परिसरात

* पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सुरक्षा व्यवस्थेची केली पाहणी
* अधिकार्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
* मंदिर संस्थान पदाधिकार्यांसोबतही चर्चा
अमरावती/19 सप्टेंबर : नवरात्रोत्सव दोन दिवसांनी, 22 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिरांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि उपस्थित अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या. या उत्सवात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिर परिसरात 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात दररोज हजारो भाविक अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतात. हे लक्षात घेता शहर पोलिस प्रशासन दरवर्षी विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करीत असते, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांनी एकवीरा देवी मंदिराला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त श्याम घुगे, राजापेठचे पुनीत कुलट, कोतवालीचे मनोहर कोटनाके आणि शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक प्रशांत वांगे उपस्थित होते. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दोन्ही मंदिर परिसराला भेट देऊन पुरुष आणि महिला दोघांसाठीही प्रवेश व निर्गमन व्यवस्थेची पाहणी केली. नवरात्रोत्सवादरम्यान कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या, महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था आणि विशिष्ट पोलिस तैनातीची सविस्तर माहितीही त्यांनी घेतली. यावेळी पोलीस आयुक्तांनी अंबादेवी आणि एकवीरा देवी संस्थांमधील पदाधिकार्यांशी सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा करून अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या.




