ऑर्थोपेडिक डॉक्टरवर महिलेसोबत गैरवर्तनाचा आरोप

परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

-कारवाईसाठी पिडितेचा आंदोलनाचा इशारा
-डॉक्टरांनी आपल्यावरील आरोप फेटाळले
अचलपूर / 24 जुलै : डॉक्टर हा रुग्णाचा मानसिक आधार मानला जातो. रुग्णाशी सौजन्यपूर्ण व आदराने संवाद साधणे हे प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाचे आद्यकर्तव्य असते. मात्र, परतवाडा येथील नवले ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या एका महिलेवर व तिच्या आईवर डॉक्टरने कथितरित्या अरेरावीची भाषा वापरून त्यांना दवाखान्यातून हाकलून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार संबंधित महिलेने परतवाडा पोलिस ठाण्यात दाखल केली असून, यावर भारतीय न्याय संहिता (इछड) 2023 अंतर्गत कलम 352 अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
धोतरखेड़ा येथील महिला 21 जुलै रोजी वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. शशिकांत नवले यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. याच दरम्यान तिच्या मुलीवर एका दुसर्‍या रुग्णालयात ऑपरेशन करण्यात आले होते. या गोष्टीवरून डॉक्टर नवले संतापले व संबंधित महिला आणि तिच्या आईवर रागाने बोलून त्यांना रुग्णालयाबाहेर काढले, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीनुसार डॉक्टरांनी तिच्याशी अशोभनीय भाषा वापरली आणि मानसिक छळ केला.
या तक्रारीनंतर परतवाडा पोलिस ठाण्याने प्राथमिक चौकशीनंतर भारतीय न्याय संहिता कलम 352 अंतर्गत एनसी (गैरदंडनीय) स्वरूपात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परतवाडा परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, डॉक्टर नवले यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेची चर्चा असून, वैद्यकीय व्यवसायातील शिष्टाचार पाळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. पीडित महिलेचे पती शेख नईम शेख रहीम यांनी उपविभागीय अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती यांच्याकडे निवेदन सादर केले असून, आठ दिवसांत संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई झाली नाही तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
तर दुसरीकडे डॉक्टर शशिकांत नवले यांनी महिलेने त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहे. सदर महिला सांगते आहे तसा प्रकार घडलेला नाही. ती महिला जेव्हा दवाखान्यात आली, तेव्हा मी मानसिक तणावात होतो. मी तिला दवाखान्यातून हाकलले नाही, मात्र आवाज उंचावला हे मान्य करतो, असे नवले यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button