आराधना चौकात ऑनलाईन चक्री जुगार अड्डा
गाडगे नगर पोलिसांचा छापा

-दोघे अटकेत; मुद्देमाल जप्त
अमरावती / 30 जुलै : शहरातील गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना चौकात एका पान दुकानाच्या आडोशात सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर गुप्त माहितीच्या आधारे गाडगे नगर पोलिसांच्या डीबी पथकाने अचानक धाड टाकली. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून, जुगारासाठी वापरल्या जाणारे सुमारे 15,500 रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य व रोकड जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई देवीज हेवन अपार्टमेंटमधील ‘कार्तिक पान पॅलेस’ या दुकानात करण्यात आली. येथे दुकानाचा मालक पवन ज्ञानेश्वर अडलिंगे (वय 22, रा. शिव नगर, विलास नगर मागे) याने दुकानात पडद्यामागे ऑनलाईन जुगारासाठी इलेक्ट्रॉनिक साहित्याची सुसज्ज व्यवस्था केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानात टीव्ही स्क्रीन, मॉनिटर, गेमिंग बॉक्स, नेट पॉट, अॅडाप्टर, माऊस, की-बोर्ड व डाटा केबल आदी उपकरणांचा वापर करून चक्री नावाचा ऑनलाईन जुगार सुरू होता.
या ठिकाणी प्रथमेश दत्ता अमृते (वय 22, रा. लक्ष्मी नगर, लहरी बाबा मंदिराजवळ) हा युवक बसून ऑनलाईन गेममध्ये पैशांची बाजी लावत जुगार खेळताना आढळून आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून, जुगाराचे सर्व साहित्य आणि रोकड असा एकूण 15,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गाडगे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर, निरिक्षक विजया पंधरे, समाधान वाटोरे, तसेच डीबी पथक प्रमुख एपीआय मनोज मानकर, डीबी इंचार्ज पोहेका भारत वानखडे, नापोका राजेश बुरेले, पो.का. नंदकिशोर करोची, दुलरेज खान, महेश शर्मा, रुपेश हटकर, व राज देवीकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
पुढील तपास सुरू असून, या ऑनलाईन जुगारामागे अजून कोणी मास्टरमाइंड आहे का, याची चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणांना जुगाराच्या विळख्यात ओढणार्या प्रकारांवर पोलिसांकडून पुढील काळातही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.




