प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत अमरावतीचे जुने चेहरे पुन्हा चमकले!
सुनिल देशमुख, भैय्या पवार, एडतकर कायम

-विरेंद्र जगताप नव्याने उपाध्यक्ष
-चिमोटे, मोहोड, बोरकर यांनाही स्थान
अमरावती / 30 जुलै : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी असताना अखेर प्रदेश काँग्रेसने आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनंतर ही कार्यकारिणी अंतिम करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीत 36 उपाध्यक्ष, 108 महासचिव, तर 95 सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमरावतीसह विदर्भातील अनेक अनुभवी व निष्ठावान नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
अमरावतीचे माजी आमदार व माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भैय्या पवार यांना उपाध्यक्ष पदावर कायम ठेवण्यात आले आहे. तर चांदुर रेल्वेचे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांची काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत नव्याने उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हरिभाऊ मोहोड, किशोर बोरकर, मिलिंद चिमोटे, अॅड. दिलीप एडतकर यांची महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. आसिफ तवक्कल यांना सचिव पदावर कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय, माजी मंत्री यशोमती ठाकूर या आधीच काँग्रेसच्या राजकीय विषय समितीच्या सदस्य आहेत.
विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलासा देणारी बाब म्हणजे प्रदेश कार्यकारिणीत विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाल्याचे चित्र आहे. यामध्ये उपाध्यक्ष, महासचिव व सचिव यांचा समावेश असून, पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पाय रोवण्याचा निर्धार केल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, नव्या कार्यकारिणीची घोषणा होण्यासाठी तब्बल 6 महिने लागले. आता ही घोषणा झाल्यानंतर पक्षाने स्थानिक पातळीवर जिल्हा निहाय सभा-संमेलनांवर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले आहेत.
-स्थानिक निवडणुकांसाठी सज्ज काँग्रेस
पंचायत समितीपासून ते महापालिकांपर्यंतच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, काँग्रेसने वेळेवर संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केल्याचे या कार्यकारिणीच्या घोषणेतून स्पष्ट होते. जुन्या-नव्या चेहर्यांचा योग्य मेळ घालत काँग्रेस आता पुन्हा एकदा जनता दरबारी उतरण्यास सज्ज झाली आहे. अमरावती जिल्हा परिषद, महानगरपालिकेसह जिल्ह्यातील पंचायत समित्या, नगर पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.




