अधिकार्‍यांनो सुधरा अन्यथा अंगावर मका ओतू

मेळघाटात आदिवासी शेतकर्‍यांची थट्टा थांबवा

राहुल येवले यांचा प्रशासनाला थेट इशारा

अमरावती / 25 फेब्रुवारी : मेळघाटातील आदिवासी विकास महामंडळाकडून मका खरेदीच्या नावाखाली आदिवासी शेतकर्‍यांची उघड फसवणूक सुरू असून हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.
प्रत्येक खरेदी केंद्रावर 500 ते 600 शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने मका विक्रीसाठी नोंदणी केली होती, मात्र प्रशासनाने केवळ 100 च्या आसपास शेतकर्‍यांकडूनच मका खरेदी करून बाकीच्यांना वार्‍यावर सोडले आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून यामागे प्रशासनाचा नक्की काय हेतू आहे, अशी शंका आता उपस्थित होत आहे. तातडीने सर्व नोंदणीकृत शेतकर्‍यांचा मका खरेदी न केल्यास अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने संबंधित अधिकार्‍यांच्या अंगावर मका ओतून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड दम जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी दिला आहे. दुर्गम भागातील गरीब शेतकरी आधीच संकटात असताना महामंडळाच्या या ढिसाळ कारभारामुळे त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकर्‍याचा मका तातडीने विकत घेतला जावा, ही आमची ठाम मागणी आहे. जर प्रशासनाने आपल्या भूमिकेत बदल केला नाही, तर होणार्‍या सर्व परिणामांना संबंधित अधिकारीच सर्वस्वी जबाबदार राहतील, असे राहुल येवले यांनी स्पष्टपणे बजावले आहे. या अन्यायाविरोधात आता मेळघाटातील शेतकरी आक्रमक झाला असून युवक काँग्रेस या लढ्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

संबंधित बातम्या

Back to top button