नर्सिंग कर्मचार्याचे काम बंद आंदोलन
बेस्ट रुग्णालयातील डॅाक्टरवरील हल्ल्याचा निषेध

* आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
अमरावती / 28 ऑक्टोबर – गाडगे नगर पोलिस स्टेशन हद्दीतील यास्मिन नगरमध्ये सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास वलगाव रोडवरील बेस्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णासह त्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने डॉक्टरने समजुतीचा प्रयत्न केला. मात्र या लोकांनी उलट डॉक्टर बोरवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेस्ट रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून डॉक्टरवरील हल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. दुसरीकडे बेस्ट रुग्णालयाच्या नर्सिंग स्टाफने घटनेचा निषेध करत कामबंद आंदोलनाची भूमिका घेतली असून त्यांनी आरोपींना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. स्टाफच्या कामबंद आंदोलनामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच बेस्ट रुग्णालयातील ओपीडी आणि आपत्कालीन सेवा प्रभावित झाली आहेत. रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांच्या सुविधेसाठी उपाययोजना केल्या असून रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. गाडगे नगर पोलीस सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे प्रयत्न सुरू आहेत.




