चांदूर रेल्वेत अतिक्रमणावर न.प.ची वरवरची कारवाई!
तीन ठेले, फ्लेक्स व चिकन शॉपवर हातोडा

-नागरिकांचा आरोप-प्रशासन दिखावा करतंय
चांदुर रेल्वे / 1 सप्टेंबर : शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात रविवारी नगरपरिषद प्रशासन व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई केली. मात्र ही कारवाई केवळ दिखाऊ असल्याचे चित्र नागरिकांसमोर आले. कारण तीन टिन ठेले, राजे विर संभाजी गणेशोत्सव मंडळाचे फ्लेक्स व अमरावती रोडवरील एका मटन-चिकन दुकानावरच कारवाई करण्यात आली. परंतु शहरातल्या इतर अतिक्रमणाकडे प्रशासनाने डोळेझाक केली.
नगरपरिषदेकडून याआधी अतिक्रमण हटविण्याबाबत मुनादी करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी कारवाईला प्रारंभ झाला. पोलिस स्टेशनलगत असलेल्या काही दुकाने, गणेशोत्सव मंडळाचे फ्लेक्स, तसेच अमरावती रोडवरील मटन-चिकन दुकानांवर हातोडा पडला. पण व्यापारी संकुल परिसर, गाडगे बाबा मार्केट, अमरावती रोडवरील विविध भाग, बौद्ध-हिंदू-मुस्लिम स्मशानभूमीजवळील भाग, शासकीय विश्रामगृहाजवळील जागा इथं मात्र अतिक्रमण पूर्ववत राहिलं.
शहरातील गल्ली-बोळांपासून मुख्य रस्त्यांवर उघडपणे मांसाहार विक्री, अनधिकृत ठेले-हट्ट्या, तसेच इतर व्यावसायिक अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ठिकाणी प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ काही ठरावीक दुकाने आणि फ्लेक्सवरच कारवाई करून अतिक्रमण हटविले अशी स्वतःची पाठ थोपटून घेतली, असा नागरिकांचा आरोप आहे. यामुळे अतिक्रमणाची समस्या कायमच असून, प्रशासनाची रविवारी झालेली कारवाई ही निव्वळ लिपापोती असल्याची चर्चा शहरभर आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, अतिक्रमण कायम राहून कारवाईचा केवळ दिखावा होत आहे अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
रविवारी झालेल्या या कारवाईत नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी तसेच पोलिस दलाने सहभाग नोंदविला. मात्र अतिक्रमण जसंच्या तसं राहिल्याने प्रश्न अनुत्तरितच असल्याचे दिसून येते.




