भटक्यांचा डेरा हटवला; पार्किंगसाठी जागा मोकळी
पोलिस-मनपा प्रशासनाची संयुक्त कारवाई

-व्यापारी व वाहनधारकांना दिलासा
-जयस्तंभ ते राजकमल चौक परिसर स्वच्छ
अमरावती / 8 सप्टेंबर : शहरातील जयस्तंभ चौक ते राजकमल चौक या महत्त्वाच्या मार्गावरील उडानपुलाखाली दीर्घकाळापासून डेरा जमवून बसलेल्या भटक्यांना सोमवारी (दि. 8 सप्टेंबर) पोलिस व महानगरपालिकेच्या संयुक्त कारवाईत हटवण्यात आले. थानेदार मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वाखालील कोतवाली पोलिस पथकासोबत मनपा अधिकारी व कर्मचार्यांनी ही मोहिम राबवून भटक्यांना त्यांच्या संपूर्ण संसारासकट वाहनांमध्ये बसवून थेट शहराबाहेर सोडले.
मालवीय चौक ते राजकमल चौक या उडानपुलाखाली पार्किंगसाठी राखीव जागा असून, तीच अनेक दिवसांपासून भटक्या समुदायातील कुटुंबांनी ताब्यात घेतली होती. येथे त्यांनी डेरा ठोकल्याने परिसरात अस्वच्छता पसरली होती. शिवाय हेच भटके सिग्नल चौकांवर वाहनचालकांना त्रास देत असल्याने व्यापारी, प्रवासी व वाहनधारक वैतागले होते. पार्किंगची व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाल्याने वाहनधारकांना प्रतिष्ठानांसमोर किंवा रस्त्याच्या कडेला गाड्या लावाव्या लागत होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी तीव्र झाली होती.
यापूर्वीही मनपा व पोलिस प्रशासनाने अशा प्रकारच्या कारवाया करून भटक्यांना हटवले होते, मात्र काही दिवसांतच ते पुन्हा त्याच ठिकाणी परत येत. यावेळी मात्र अधिक कडक कारवाई करून त्यांना शहराबाहेर नेण्यात आले. सध्या गणेशोत्सव सुरू असून विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघत आहेत. 11 सप्टेंबर रोजी न्यू आझाद गणेश मंडळाचा विसर्जन सोहळा मोठ्या प्रमाणावर पार पडणार आहे. त्या वेळी हजारो नागरिक उपस्थित राहणार असल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण येणार आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीच पोलिस व मनपा प्रशासनाने भटक्यांवर ही संयुक्त कारवाई केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.




