मोर्शी तालुक्यात नऊ तासांचा मुसळधार पाऊस
फळबागा जलमय, संत्र्याला गळती

-बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव
मोर्शी : मोर्शी तालुक्यात 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सातपासून पहाटे चारपर्यंत तब्बल नऊ तास मुसळधार पावसाचा जोर राहिला. राजुरवाडी, कवठाळ, भांबोरा, तुळजापूर, निंबारणी, कमळापूर, शिरूर, शिरलस या गावांत गदाभूकी नदी व सांड नाल्यांनी तुडुंब भरून रौद्ररूप धारण केले. घराघरांत पाणी शिरले. काही ठिकाणी टोंगळ्यापर्यंत पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. रस्ते व पूल पाण्याखाली जाऊन गावांचा संपर्क तुटला.
कापूस, सोयाबीन, भात या पिकांसह शेकडो एकर शेतजमीन एका रात्रीत वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली असून शेतकर्यांची महिनोन्महिन्यांची मेहनत क्षणात उद्ध्वस्त झाल्याचे हृदयद्रावक दृश्य दिसत आहे. मोर्शी तालुका ‘विदर्भाचे कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे तब्बल 25 हजार हेक्टरवर संत्रा फळबागा आहेत. गेल्या वीस दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने आधीच बागांची अवस्था बिकट होती. 2 सप्टेंबर रोजी घोडदेव, डोंगर यावली, सालबर्डी, पाळा परिसरात झालेल्या अतिवृष्टीने फळबागा अक्षरशः जलमय झाल्या. सततच्या ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांवरील संत्री व मोसंबी मोठ्या प्रमाणात गळायला लागली आहेत.
फळबागांमध्ये गळालेल्या संत्र्यांचा सडा पाहून शेतकरी धास्तावले आहेत. या गळतीमुळे तालुक्यातील शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने या नुकसानीची दखल घेऊन सर्वेक्षण करून मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.




