वृत्तामुळे न.प.ला जाग : ‘आपली मातृभूमी’च्या बातमीने ढाप्यांच्या दुरुस्तीस गती
सहा महिन्यांपासून रखडलेले काम बातमी प्रसिद्ध होताच पुन्हा मार्गी

चांदूरबाजार /19 नोव्हेंबर : नगरपरिषद हद्दीत अनेक महिन्यांपासून अडकून पडलेले व तुटलेल्या ढाप्यांचे (नालीवरील रपटे) काम अखेर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, दैनिक आपली मातृभूमीने 16 नोव्हेंबर रोजी ही समस्या ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर नगरपरिषद प्रशासन व बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत कामास सुरुवात केली. वृत्तप्रभावामुळे प्रशासनाला जाग आली, असा नागरिकांचा प्रतिसाद आहे.
गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या रस्त्यावरच्या ढाप्यांचा प्रश्न गंभीर स्वरूपात निर्माण झाला होता. ढापे तुटल्यामुळे रस्ता धोकादायक बनला होता. पावसाळ्यात नाले तुडुंब भरल्यानंतर पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाळा ओसरल्यानंतरही रस्त्यांची डागडुजी न झाल्याने स्थिती कायमच बिकट होती. या मार्गाने शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. वृद्ध नागरिक, महिला आणि कामगार वर्गाला वाटचाल करताना संतुलन बिघडून पडण्याची भीती सतत जाणवत होती. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, परंतु नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने स्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रश्न अधिकच तीव्र होत गेला.
16 नोव्हेंबर रोजी दैनिक आपली मातृभूमीने या प्रश्नावर विस्तृत बातमी प्रकाशित केली. नागरिकांच्या अडचणी, रखडलेली दुरुस्ती, प्रशासनाचे उदासीन धोरण आणि रस्त्याची दयनीय अवस्था याबाबत स्पष्टपणे प्रकाश टाकण्यात आला. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपरिषद अधिकार्यांनी तातडीने पाहणी केली. दीर्घकाळ प्रलंबित असलेले ढापे बांधकाम विभागाला त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वृत्तपत्रात समस्या प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रशासन हलते, असे अनेकदा पाहायला मिळते. या प्रकरणातही तसाच प्रकार घडल्याचे नागरिकांचे निरीक्षण आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून प्रलंबित असलेले हे काम निवडणूक पार पडल्यानंतर काही दिवसातच सुरू झाल्यानेही लोकांमध्ये चर्चा रंगत आहे. आचारसंहितेत असे काम करता येते का, हा प्रश्नही काही नागरिक उपस्थित करत आहेत. तथापि, कामाला सुरुवात झाल्यामुळे स्थानिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसह ढाप्यांच्या बदलामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि पादचारी सुरक्षिततेत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. नगरपरिषद प्रशासनाने पुढील काही दिवसांत संपूर्ण दुरुस्ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. दैनिक आपली मातृभूमीच्या वृत्तप्रभावामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्येकडे प्रशासनाने केलेली ही तात्काळ दखल, स्थानिक पत्रकारितेच्या प्रभावाची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ठरली आहे.



