न्यू आझाद मंडळाचा ‘विदर्भाचा राजा’ विसर्जन सोहळ्यास सज्ज
आज ढोल-ताशांच्या गजरात शाही शोभायात्रा

-महाआरतीने उजळणार राजकमल चौक
-कलात्मक रांगोळ्यांनी सजणार रस्ते
-पथकांसाठी विशेष पारितोषिके
अमरावती / 10 सप्टेंबर : खापर्डे बगीचा स्थित न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा ‘विदर्भाचा राजा’ची विसर्जन शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारी, 11 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता दिमाखात काढण्यात येणार आहे. या सोहळ्याची वैशिष्ट्ये म्हणजे भव्यदिव्य मिरवणूक, ढोल-ताशांचा निनाद, झांजांचा कडकडाट, कलात्मक झांकी, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग. अमरावतीचे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते गणरायाची विधीवत आरती करुन या भव्यदिव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.
यंदा राजकमल रेल्वे उड्डाणपुल बंद असल्याने शोभायात्रेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हा मार्ग सुमारे दीड किलोमीटरने वाढविण्यात आला असूनही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. मंडळाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि मुख्य संरक्षक दिनेश बूब यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शोभायात्रेला ऐतिहासिक स्वरूप देण्याचा निर्धार केला आहे. शोभायात्रा खापर्डे बगीचा येथून सुरू होऊन इर्विन चौक, मालवीय चौक, जयस्तंभ चौक, श्याम चौक मार्गे राजकमल चौकात पोहोचेल. तेथे पारंपरिक पद्धतीने महाआरती व आतषबाजीचा भव्य सोहळा होणार आहे. यावेळी खासदार बळवंत वानखडे, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री प्रविण पोटे, माजी मंत्री जगदिश गुप्ता, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी खासदार अनंत गुढे, माजी महापौर विलास इंगोले, भाजपचे शहर अध्यक्ष नितीन धांडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, मनपातील माजी गटनेते तुषार भारतीय, अॅड. प्रशांत देशपांडे, उद्योजक संजय जाधव, अमरावती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन, अमरावती केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी, अमरावती हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष बिट्टू सलूजा, दै. हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे, उद्योजक गोपाल पनपालिया, उद्योजक विजय तलडा, उद्योजक दिलीप पोपट, उद्योजक विनोद डागा, उद्योजक ज्ञानेश्वर हिवसे आणि अवी भडांगे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
त्यानंतर शोभायात्रा श्याम चौक, सिटी कोतवाली, वसंत चौक, दीपक चौक मार्गे मोसीकॉल येथे जाऊन गणरायाचे विसर्जन केले जाईल. या मिरवणुकीत स्वराज्य, छत्रपती, राम राज्य, शौर्य रूद्र, जगदंब, शिव साम्राज्य, हिंदवी स्वराज्य, शिव राष्ट्र, राज्य सम्राट, धामणगाव यांसह डझनभर प्रसिद्ध ढोलपथके सहभागी होणार आहेत. त्यांच्या जोशपूर्ण तालांमुळे संपूर्ण अमरावती दणाणून जाणार आहे. याशिवाय पारंपरिक झांजपथके, आकर्षक झांकी आणि भव्य आतषबाजी सोहळ्याला रंगत आणणार आहेत. पथकांसाठी तीन पारितोषिके ठेवण्यात आली असून त्यांची निवड पाच सदस्यीय समिती करणार आहे.
संपूर्ण शोभायात्रा मार्ग डी. स्टेट आर्ट सेंटर तर्फे रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजवला जाणार आहे. गणेशभक्तांना भक्तीभावाची अनुभूती देण्यासोबतच या कलात्मक सजावटीमुळे मिरवणुकीला वेगळेच सौंदर्य प्राप्त होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पश्चिम विदर्भातून हजारो भाविक अमरावतीत दाखल होणार असून त्यांच्या वाहनांसाठी सायंस्कोर मैदान, नेहरू मैदान, अंबापेठ, श्याम चौक, बापट चौक, तहसील कार्यालय आणि नमुना परिसर येथे पार्किंगची सोय केली आहे. गर्दी टाळण्यासाठी सिंगल लाईन पार्किंगचे आवाहन आयोजकांनी केले आहे. संपूर्ण अमरावतीत या शोभायात्रेबाबत प्रचंड उत्सुकता असून गुरुवारचा दिवस हा केवळ विसर्जनाचा नाही, तर भक्तिभाव, परंपरा आणि उत्साहाचा भव्य उत्सव ठरणार आहे.




