नवरात्रोत्सव : सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

शहरात 492 दुर्गा, 102 शारदा मंडळ

-65 ठिकाणी रास-गरबा
अमरावती / 18 सप्टेंबर :  22 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या नवरात्रौत्सवात यंदा अमरावती शहरात तब्बल 492 सार्वजनिक मंडळांत दुर्गादेवी व 102 ठिकाणी शारदादेवीची स्थापना होणार आहे. तसेच 65 ठिकाणी रास-गरब्याचा उत्सव रंगणार असून, त्यामुळे संपूर्ण शहर उत्सवी वातावरणात नहाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात देवी स्थापना व गरबा कार्यक्रम होणार असल्याने पोलिस आयुक्तालयाने कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आखला आहे.
पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली 3 डीसीपी, 3 एसीपी, 30 पोलिस निरीक्षक, 70 एपीआय-पीएसआय व तब्बल 1,350 पोलिस जवान तैनात राहणार आहेत. याशिवाय आरसीपी व क्यूआरटी प्लॅटून, एसआरपीएफ कंपनी तसेच 500 महिला व पुरुष होमगार्ड या बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत अग्निशमन, महावितरण, अन्न व औषधी प्रशासन, परिवहन, जिल्हा रुग्णालय, बाजार परवाना विभागाचे अधिकारी, अंबादेवी व एकवीरा मंदिर संस्थान प्रमुख तसेच विविध दुर्गादेवी, शारदा व गरबा मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नागरिक व आयोजकांना सूचना देण्यात आल्या – मंडप रस्त्यावर न लावणे, आकार मर्यादित ठेवणे, सीसीटीव्ही लावणे, महिला स्वयंसेवक नेमणे व सुरक्षेसाठी मंडळाने जबाबदारी घ्यावी. तसेच झाडांच्या फांद्या, विद्युत तारा, प्रकाशयोजनेची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी असा आग्रह नागरिकांनी धरण्यात आला.
सायबर पोलिसांचे स्वतंत्र पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवणार असून रॅली मार्गावर सीसीटीव्ही व व्हिडिओग्राफरच्या साहाय्याने देखरेख केली जाणार आहे. शोभायात्रा, विसर्जन मिरवणुकीत शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ, भडक गीते व उत्तेजक झांकी यांवर बंदी घालण्यात आली आहे. महत्त्वाच्या चौकांवर फिक्स पॉइंट, 14 सीआर मोबाईल व्हॅन, तर महिला सुरक्षेसाठी 10 दामिनी पथके तैनात राहतील. वृद्ध व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा सज्ज आहे.
-सोशल मिडियावर पाळत
उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या तत्वांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त चावरिया यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. सोशल मिडियावर पाळत राहणार असून आक्षेपार्ह पोस्ट टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोस्टद्वारे सामाजिक स्वास्थ्य बिघडविणार्‍यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हा उत्सव शांततेत व हर्षोल्लासात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला योग्य तो सहयोग द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button