श्रीदेवीच्या अंदाजात नवनीत राणा यांचा चुलबुला डान्स
सोशल मीडियावर रील व्हायरल

अमरावती / 31 जुलै : भाजपच्या स्टार प्रचारक नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या लोकप्रिय चित्रपट चालबाज मधील गाजलेलं गाणं ‘किसी के हाथ ना आएगी ये लड़की’ वर पावसात नाचतानाचा खास अंदाज दाखवला आहे.
श्रीदेवी यांनी या गाण्यात पारदर्शक छत्री हातात घेऊन केलेल्या लाजवाब डान्सने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती करत नवनीत राणा यांनीही निसर्गरम्य ठिकाणी पावसात पारदर्शक छत्रीसह हे गाणं रिक्रिएट केलं आहे. त्यांच्या या डान्स स्टाईलमध्ये श्रीदेवींची झलक दिसून येत आहे. त्यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला असून तो पाहता पाहता जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला हजारो लाईक्स व शेअर्स मिळत असून नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. अनेकांनी त्यांच्या उत्साही आणि चुलबुल्या शैलीचं कौतुक केलं आहे.
नवनीत राणा या त्यांच्या अद्वितीय आणि बेधडक शैलीसाठी ओळखल्या जातात. केवळ राजकीय व्यासपीठावरच नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्या कायम आघाडीवर असतात. कधी क्रिकेटच्या मैदानात बॅट घेऊन, कधी महिलांबरोबर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन, कधी ट्रॅक्टर चालवताना, तर कधी आदिवासी लोकगीतांवर नृत्य करत त्या चर्चेत येतात. त्यांचा सोशल मीडियावरील सक्रिय सहभागही उल्लेखनीय आहे. त्या वेळोवेळी व्हिडीओ आणि रील्सच्या माध्यमातून सामान्य जनतेशी संवाद साधतात आणि अनेकदा आपल्या राजकीय विरोधकांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देताना दिसतात.
विशेष म्हणजे, या व्हिडीओत नवनीत राणा यांनी कोणताही राजकीय संदेश दिलेला नाही. मात्र, त्यांच्या चुलबुल्या आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाजामुळे त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. श्रीदेवींच्या स्टाईलमध्ये केलेला हा डान्स प्रेक्षकांना भुरळ घालत असून, नवनीत राणा यांची ही नवी अदा सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.




