नांदगावपेठ हादरले! तिघांवर रॉड-चाकूने प्राणघातक हल्ला

दुचाकीचा कट लागल्याचे क्षुल्लक कारण

-गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित थरार
-जखमी रुग्णालयात, प्रकृती गंभीर
नांदगावपेठ / 27 ऑगस्ट : नांदगावपेठ परिसरातील बसस्टँडवर मंगळवारी (दि. 26 ऑगस्ट) रात्री तुफान रक्तरंजित थरार घडला. दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ वादातून थेट जीवे मारण्याचा कट रचून तिघा तरुणांवर लोखंडी रॉड व धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला परिसरात प्रचंड दहशत पसरली असून नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.
फिर्यादी ऋतिक राजेंद्र नाईकवाड (24, रा. इतवारा पुरा, नांदगावपेठ) व त्याचा मित्र राहुल सुंदरकर (29) हे कामानिमित्त बाहेर गेले असता ही घटना घडली. आरोपी कृष्णा गणेश चुडे (22, रा. नांदगावपेठ) याने दुचाकी चालवताना ऋतिक याला कट लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. नागरिकांनी तो वाद मिटवला मात्र काही वेळाने कृष्णा चुडे याने राहुलला फोन करून बसस्टँडवर बोलावले. यानंतर ऋतिक नाईकवाड, राहुल सुंदरकर, ऋषिकेश आमले आणि अमोल चुडे हे चौघे बसस्टँडवरील मंगलमूर्ती पान सेंटरजवळ पोहोचले. तेथे आधीच दबा धरून बसलेले रोहित संदीप अमृते, कृष्णा चुडे व इतर दोन अनोळखी युवकांनी लोखंडी रॉड आणि चाकूंनी तुफानी हल्ला केला.
रोहित अमृते व कृष्णा चुडे यांनी लोखंडी रॉडने ऋतिकवर हल्ला करून त्याच्या हातावर गंभीर जखम केली. तर अनोळखी दोघांनी खिशातून चाकू काढून अमोल चुडे यांच्या पोटावर व ऋषिकेश आमले यांच्या पार्श्वभागावर भोसकले. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी रोहित संदीप अमृते व कृष्णा गणेश चुडे यांच्यासह इतरांवर भा.दं.वि. कलम 307, 34 तसेच शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे नांदगावपेठ परिसरात भीतीचे सावट पसरले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
-परिसरात भीतीचे सावट व संताप
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे नांदगावपेठ परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून नागरिकांना सुरक्षिततेसाठी जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेबद्दल नागरिकांमधून संतापही व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button