सातपुड्याच्या पायथ्याशी उभारणार ‘नमो अहिल्यादेवी वटवन’
पाच हेक्टर वनजमिनीवर निर्मिती

-खा. डॉ. अनिल बोंडे यांचा पुढाकार
-1001 वटवृक्षांची भव्य लागवड
मोर्शी / 24 ऑगस्ट : मोर्शी तालुक्यात अवैध वृक्षतोड वाढत असल्याने पर्यावरणाचा तोल बिघडत चालला आहे. या पार्श्वभूमीवर हरित क्रांतीची ठोस पावले उचलण्यासाठी, तसेच ‘पेड मॉ के नाम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र संकल्पनेला गती देण्यासाठी, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी मठाजवळील पाच हेक्टर वनजमिनीवर 1001 वटवृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
ही मोहीम ‘नमो अहिल्यादेवी वटवण वृक्षारोपण’ या अनोख्या उपक्रमातून साकारली जात आहे. रविवार दिनांक रोजी झालेल्या भव्य उद्घाटन सोहळ्यात खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वटवृक्षाची पहिली लागवड करून संकल्पाची पूर्तता केली. या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान जगद्गुरु संत राजराजेश्वर माऊली यांनी भूषविले. यावेळी आमदार उमेश उर्फ चंदूभाऊ यावलकर, अमरावतीचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर., वनपरिक्षेत्राधिकारी अमोल चौधरी, सरपंच सौ. वर्षाताई घोरमाडे, उपसरपंच सौ. प्रीतीताई जीचकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सालबर्डी तीर्थस्थळाला पर्यटनाचे नवे रूप प्राप्त व्हावे, यासाठी खासदार डॉ. बोंडे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपये मंजूर केले असून या निधीतून अद्वितीय वटवृक्ष उद्यान आकार घेणार आहे. या ‘हरित गुरुदक्षिणा’मुळे आध्यात्मिक वातावरणासोबत निसर्गाचे संतुलन साधले जाणार आहे.
-वटपौर्णिमेला होणार अनोखा सोहळा
वृक्षलागवडीनंतर हे उद्यान वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वसामान्य भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे. महिलांना यावेळी आपल्या कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाशी जोडलेला पारंपरिक संस्कार अर्पण करता येणार आहे. भविष्यात वटवनात वटवृक्ष मार्ग व विश्रांतीसाठी बेंचेस उभारण्यात येणार असून, निसर्गप्रेमी व भाविक यांना हा अनुभव आध्यात्मिक आनंदासह देणार आहे.
-निसर्गरक्षणासोबत आध्यात्मिक भर
मोर्शी-सालबर्डी मार्गावर साकारल्या जाणार्या या हरित उपक्रमामुळे केवळ निसर्गरक्षणच नव्हे, तर सालबर्डीच्या महात्म्यातही मोठी भर पडणार आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणारा ‘वटवन प्रकल्प’ असून हिरवाईसोबत पर्यटन, संस्कृती व श्रद्धेचे संगम साधणारा ठरणार आहे.




