न. प. चा लाचखोर विद्युत अभियंता जाळ्यात
कंत्राटी कर्मचार्यालाही अटक

-वरुड येथे एसीबीची कारवाई
-दीड लाख घेताना रंगेहाथ पकडले
अमरावती / 22 मे: वरुड नगर परिषदेतील विद्युत अभियंता व एका कंत्राटी इलेक्ट्रशिनला दीड लाख रूपायांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवार, 22 मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास रंगेहाथ अटक केली आहे. महेश मुरलीधर दुपारे (38) असे विद्युत अभियंत्याचे तर शरद ज्ञानेश्वर बेलसरे (44) असे कंत्राटी इलेक्ट्रशिनचे नाव आहे.
इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टरच्या तक्रारीवरुन एसीबीने ही कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराकडे एम.एस.ई.डी.सी.एल.चे काम करण्याचा परवाना आहे. वरूड नगर परिषदेमध्ये नवीन रस्त्यांचे कामे सुरू आहे. त्या रस्त्याच्या कामात अडथळा ठरत असलेले इलेक्ट्रीक पोल्स व रोहित्र हटविण्याच्या कामाचे कंत्राट तक्रारदाराला मिळाले होते. त्याप्रमाणे वरूडमध्ये चौधरी मंगल कार्यालय ते पार्डी रोड तसेच शासकिय विश्रामगृह ते मटन मार्केट अशी दोन कामे सुरू आहेत. त्यातील झालेल्या कामाचे 3 लक्ष रूपये व 2 लक्ष 50 हजार रूपयांच्या कामाचे बिल त्यांनी नगर परिषदेत सादर केले होते. सदर कामाचे मोजमाप पुस्तिका मंजूर करून कामाचे बिल मंजुरीकरीता लेखा शाखेत पाठविण्याकरीता नगर परिषदेचे विद्युत अभियंता महेश दुपारे यांनी तक्रारदार यांच्याकडे एकूण बिल रक्कमेच्या 35 टक्के लाच रक्कमेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी 19 मे रोजी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन 20 मे रोजी महेश दुपारे यांनी वरील नमुद बिलांचे कामाचे मोजमाप पुस्तिका मंजूर करून कामाचे बिल मंजुरीकरीता लेखा शाखेत पाठविण्याकरीता 2 लक्ष 50 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दिड लक्ष लाच स्विकारण्याची समंती दर्शविली. 22 मे रोजी लाच लुचपत विभागाने सापळा रचला व महेश दुपारे यांनी लाच रक्कम खाजगी इसम शरद बेलसरे यांना स्विकारण्यास सांगितली.
शरद बेलसरे यांनी कार्यालयात स्विकारताच त्यांना लाच लुचपत विभागाकडून ताब्यात घेण्यात आले. त्याच वेळेला दुसर्या पथकाने महेश दुपारे यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींविरुद्ध वरूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अभय आष्टेकर यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी निरिक्षक भारत जाधव, निरिक्षक केतन मांजरे, उपेंद्र थोरात, वैभव जायले, शैलेश कडु व चालक राजेश बहिरट यांच्या पथकाने केली.