मत चोरीमुळेच माझा निवडणुकीत पराभव

माजी आमदार राजकुमार पटेलांचा आरोप

-प्रहारला सोडणार, काँग्रेस प्रवेश निश्चित
-मेळघाटातील राजकारण तापणार
अमरावती / 1 सप्टेंबर : मेळघाटच्या आदिवासी भागातील लोकनेते आणि तीन वेळा आमदार राहिलेले राजकुमार पटेल यांनी आपल्या विधानसभा पराभवाचे ठपके थेट ‘मत चोरी’वर ठेवले आहेत. मी हरलो नाही, मला हरवण्यात आलं. माझं मत चोरलं गेलं! अशी थेट आणि घणाघाती प्रतिक्रिया देत पटेल यांनी पुन्हा एकदा राजकीय वादळ उठवलं आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रहार पक्षाच्या उमेदवारीवर पटेल मैदानात उतरले होते. आदिवासी जनता त्यांच्यासोबत ठाम उभी होती, असा त्यांचा दावा आहे. पण प्रतिस्पर्धी उमेदवार केवळराम काले यांना ‘दीड लाख मते’ कशी मिळाली, असा सवाल पटेल यांनी उपस्थित केला. जनतेने माझ्या बाजूने मतदान केलेलं मला खात्रीने माहिती आहे, पण निकालात उलटं दिसलं. म्हणजेच मध्यंतरी कुठेतरी मते चोरली गेली. राहुल गांधी रोज सांगतात ती मत चोरीच माझ्या पराभवामागे कारणीभूत आहे, असे राजकुमार पटेल यांनी म्हटले आहे.
पराभवाचे राजकारण मागे टाकत पटेल आता काँग्रेसच्या मैदानात उतरणार आहेत. पुढील 8 ते 10 दिवसांत काँग्रेसचे बडे नेते उपस्थित असताना त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे त्यांनी जाहीर केले. गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेला वेग आला होता, आता सर्व तयारी झाली आहे. काँग्रेसचा झेंडा मी हाती घेणार, असे त्यांनी सांगितले. प्रवेश आधीच होऊ शकला असता, परंतु वैयक्तिक आयुष्यातील दोन दुःखद घटनांमुळे प्रक्रिया थांबली होती, असे पटेल यांनी नमूद केले.
पटेल यांनी स्पष्ट केले की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिति व नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. त्यांचं राजकारण जिवंत राहावं, सत्ता मिळावी म्हणून मी काँग्रेसचे दुपट्टे धारण करतोय. मेळघाटातील किमान 45 ते 50 टक्के मतदार आधीपासून काँग्रेसचेच आहेत, आता त्या पाठबळावर आम्ही सत्ता मिळवणार, असा आत्मविश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
राजकुमार पटेल यांनी मी हरलो नाही, माझं मत चोरलं गेलं या वाक्याने राजकीय पटावर नवा वाद उभा केला आहे. आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करून मेळघाटात नवा रंगतदार संघर्ष निर्माण करणार आहेत हे निश्चित झाले आहे. त्यांचा आरोप केवळ विरोधकांवर नाही, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ‘मत चोरी’च्या मुद्द्यामुळे मेळघाटातलं आगामी राजकारण अधिक तापणार, इतकं नक्की.
-बच्चू कडूंना मोठा धक्का बसणार
राजकीय विश्लेषकांचा कयास आहे की, पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मेळघाटातील राजकीय तोल बदलणार आहे. काँग्रेसला मजबुती मिळेल, तर प्रहार जनशक्ती पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागेल. कारण, मागील निवडणुकीत बच्चू कडूंनीच पटेल यांना सोबत घेऊन उमेदवार उभा केला होता. आता पटेल काँग्रेसकडे झुकल्याने कडू यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
-जनता जनार्दन सर्वावर मात करेल
आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा उल्लेख करताना पटेल म्हणाले, गत 25 वर्षांत 3500 कोटी रुपयांची कामं मेळघाटात आणली. इतका विकास गेल्या 50 वर्षांत झाला नव्हता. जनता जनार्दनच माझं खरं बळ आहे. मत चोरी करणार्‍यांनाही जनता योग्य वेळी उत्तर देईल, असे राजकुमार पटेल म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button