मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या खुनाच्या आरोपीला अटक
फ्रेजरपुरा पोलिसांनी मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात

अमरावती /22 सप्टेंबर : 12 जून रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृहात हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला दोषी कैदी क्रमांक सी-180 बद्री रिच्छ मुजादे (वय 32, रा. जजगर, ता. भिकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) संधीचा फायदा घेत तुरुंगातून पळून गेला. माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पळून गेलेल्या कैद्याला त्याच्या मूळ गावी भिकनगाव येथून अटक करण्यात आली असून आरोपीला अमरावतीला परत आणण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार 12 जून 2025 रोजी सकाळी 7:18 वाजता कैद्यांना बागेत काम करण्यासाठी खुल्या कारागृहात नेण्यात आले होते. दिवसभर काम, जेवण आणि चहा घेतल्यानंतर त्यांना कैदी मोजणीसाठी पुन्हा कारागृहाच्या आवारात आणण्यात आले. यावेळी लघुशंकेचा बहाणा करून गेलेला बद्री मुजादे मोजणीदरम्यान गायब असल्याचे आढळून आले. बागेत आणि कारागृहाच्या आवारात कसून शोध घेतला असता तो सापडला नाही, यामुळे कैदी पळून गेल्याचा संशय निर्माण झाला. घटनेची तक्रार फ्रेझरपुरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर फ्रेझरपुरा पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांसह धारणी पोलिसांशी संपर्क साधला. अखेर तुरुंगातून पळून गेलेला कैदी बद्री मुजादे याला मध्य प्रदेशातील भिकनगाव येथे अटक करण्यात आली. ही कारवाई शहर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि फ्रेझरपुरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच फ्रेझरपुरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) नीलेश गावंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पीएसआय राहुल महाजन, एएसआय योगेश श्रीवास, नेपोकॉन्स हरिस चौधरी, शशिकांत गवई, पोलीस कॉन्स्टेबल जयेश परिवाले, रोशन वर्हाडे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल उमेश चुलपार यांचा समावेश होता.




