अग्निशमन कर्मचार्‍याच्या मृत्यूने पालिका कर्मचारी संतप्त; इर्विन चौकात दीड तास रास्ता रोको

अमरावती /21 नोव्हेंबर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागातील बडनेरा झोनमध्ये कार्यरत असलेले राजेश वासुदेव मोहन (55) यांनी वरिष्ठांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून 20 नोव्हेंबर रोजी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृताचे कुटुंबीय, स्थानिक नागरिक आणि कर्मचारी संतप्त झाले असून आज दुपारी इर्विन चौकात दीड तास रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनील चव्हाण यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता राजेश मोहन यांनी निराशेच्या भरात कीटकनाशक प्राशन केले होते. त्यांच्या मित्राला फोन करून त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती दिली. तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मानसिक छळ, क्वार्टर रिकामी करण्याचा दबाव आणि वारंवार त्रास दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी अग्निशमन विभागातील वरिष्ठ अधिकार्यांवर केला आहे. मृत्युलेखनातही या छळाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले. दोषींवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली. मागणी मंजूर न झाल्याने पोस्टमार्टमला परवानगी देण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर कुटुंबीय, भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन दुपारी 12 वाजता रस्ता रोको आंदोलन सुरू केले. संतोष केंद्रे, लक्ष्मण पावडे आणि रामकृष्ण शिंदे या अधिकार्यांवर कठोर कारवाईच्या घोषणा करण्यात आल्या. इर्विन चौक आणि रेल्वे स्टेशन मार्गावर वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी रांगा नियंत्रित करण्यासाठी जय्यत प्रयत्न केले.तणाव वाढत असल्याचे पाहून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आंदोलकांनी लेखी आश्वासनाची मागणी केली. त्यानुसार दुपारी 2 वाजता पोलिसांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी 3 वाजता पोस्टमार्टम प्रक्रिया पोलिस संरक्षणात पूर्ण करण्यात आली आणि मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे महानगरपालिका कर्मचार्‍यांत अस्वस्थता पसरली असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. जबाबदार अधिकार्यांवर कारवाईचे लेखी आश्वासन-रास्ता रोकोदरम्यान संतप्त नागरिकांनी अग्निशमन विभागाचे अधीक्षक संतोष केंद्रे, लक्ष्मण पावडे आणि त्यांना मदत करणारे रामकृष्ण शिंदे यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली. तणाव वाढत असल्याने बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनील चव्हाण व वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि पोस्टमार्टम प्रक्रिया सुरू झाली.

संबंधित बातम्या

Back to top button