पार्किंग, सिग्नल, हॉकर्स झोनसाठी महापालिकेकडून ठोस पाउल

शहर वाहतुकीला शिस्त लावणार!

-आयुक्त सौम्या चांडक यांनी घेतली बैठक
-अनधिकृत व्यवसायांवर कारवाईचे संकेत
अमरावती / 29 जुलै : शहरातील विस्कळीत वाहतूक, अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यावरील धडपडणारे हॉकर्स यावर एकदाचा लगाम बसणार आहे. आज अमरावती महापालिकेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पार्किंग झोन, ट्राफिक सिग्नल आणि हॉकर्स झोनबाबत निर्णायक भूमिका घेण्यात आली.
बैठकीतील निर्णयानुसार शहरातील मुख्य रस्त्यांवर व बाजारपेठांमध्ये नियमित पार्किंग झोन निश्चित केले जाणार असून पार्किंग झोनमध्ये ‘पेड’ आणि ‘फ्री’ दोन्ही सुविधा असणार आहे. नागरिकांसाठी साप्ताहिक आणि मासिक पास व्यवस्था लागू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांचा समन्वय आवश्यक आहे, यावर मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी जोर दिला.
अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यासाठी आता स्पष्ट धोरण तयार होणार आहे. हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र जागा निश्चित केली जाणार आहे. त्या ठिकाणी पाणी, वीज, स्वच्छता व शेड्स यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कोणताही फेरीवाला विस्थापित न होता, सन्मानाने व्यवसाय करू शकेल, अशी भूमिका मनपा आयुक्तांनी मांडली. त्याचवेळी अनधिकृत पार्किंगवाल्यांची खैर नाही, असेही त्यांनी बजावले. नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, टोईंग व्हॅनचा अधिक वापर केला जाणार आहे. त्यासाठी ट्राफिक पोलिसांशी समन्वयाने संयुक्त कृती आराखडा तयार केला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
-नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
शहराची वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करणे ही काळाची गरज आहे. नागरिक व व्यावसायिक यांच्याशी समन्वय साधून पुढील निर्णय घेणार. त्यांचाही सक्रिय सहभाग हवा, अशी स्पष्ट भूमिका आयुक्त सौम्या चांडक यांनी मांडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, पोलीस उपायुक्त शाम घुगे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर आदींसह जवळपास 25 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button