हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम राबविण्यासाठी महानगरपालिकेची तयारी

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

अमरावती /28 ऑक्टोबर : शहरातील नागरिकांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना सकस व आनंददायी वातावरण मिळावे या उद्देशाने  अमरावती महानगरपालिकेमार्फत हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम (Raahgiri) हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी नियोजनासाठी आज, दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्राथमिक स्वरूपाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक अध्यक्षस्थानी होत्या.

बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, विभागीय समन्वय, नागरिकांचा सहभाग, तसेच वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि सांस्कृतिक उपक्रम यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि स्थानिक नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम म्हणजे केवळ एक उपक्रम नाही, तर शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात उत्साह निर्माण करणारा उपक्रम आहे. नागरिकांना आनंददायी वातावरण देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.

‘राहगिरी डे’ या नावाने ओळखला जाणारा हा उपक्रम देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला असून, आता अमरावतीतही तो सुरू होणार आहे. या अंतर्गत शहरातील ठराविक मुख्य रस्त्यांवर सकाळी काही तासांसाठी वाहनांची वाहतूक बंद ठेवून नागरिकांना चालणे, धावणे, सायकल चालविणे, योगाभ्यास, नृत्य, खेळ, संगीत, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्यवर्धक जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल आणि सामाजिक ऐक्य वाढेल. कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी विविध विभागांमधील समन्वय, नागरिकांचा सहभाग आणि शिस्तबद्ध नियोजन यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक अमरावतीकराने उत्साहाने सहभाग घ्यावा आणि शहराचे नाव उज्ज्वल करावे. तसेच, शहरातील वृत्तपत्रांनीही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

अमरावती महानगरपालिकेचा हा उपक्रम शहराच्या नागरी जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करणारा असून, नागरिकांच्या आरोग्यदायी आणि सुसंवादी जीवनशैलीकडे वाटचाल घडवून आणणारा ठरणार आहे. या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती कौशल्या एम., अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, डॉ. मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, तसेच विविध विभागांचे अधिकारी, वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button