मनपाचा 843 कोटी 74 लाखांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर

शहर विकासाचे प्रकल्प केंद्रस्थानी; 437 कोटींचे महसुली उत्पन्न अपेक्षित

अमरावती /18 मार्च – महानगरपालिका प्रशासनाने सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पीय आराखडा आज स्थायी समितीच्या विचारार्थ सादर केला. मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी 843 कोटी 74 लाख 16 हजार 3 रुपयांच्या या अर्थसंकल्पाचे प्रारूप स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्याकडे सोपवले.
या अर्थसंकल्पात शहर विकासाच्या योजनांना गती देण्यासोबतच नागरिकांना पायाभूत सुविधा तत्परतेने उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने आयुक्तच अर्थसंकल्पाचे सादरीकरण माध्यमांसमोर करत होते. मात्र, आता लोकनियुक्त प्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात आल्याने अनेक वर्षांनंतर हा अर्थसंकल्प स्थायी समितीमार्फत आमसभेत सादर होणार आहे. स्थायी समितीमध्ये या तरतुदींवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल आणि त्यानंतर तो महापालिकेच्या आमसभेत मंजुरीसाठी ठेवला जाईल. आयुक्त सौम्या शर्मा यांनी स्पष्ट केले की, शहर विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत मिळणार्‍या अनुदानासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष (हेड) ठेवण्यात आले आहे. मनपा शाळांचा दर्जा उंचावणे आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि हवेच्या गुणवत्तेसाठी अमरावतीला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने, तो दर्जा कायम राखण्याची जबाबदारी सर्वांची असून त्यादृष्टीने नियोजन केले आहे. या अर्थसंकल्पात महापालिकेला 437 कोटींचे महसुली उत्पन्न आणि गुंतवणुकीतून सुमारे 406 कोटींचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत म्हणून घरपट्टीकडे पाहिले जात असून, त्यातून 82 कोटी 50 लाख रुपये जमा होण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, शाळांमधील शिक्षकांच्या पगारासाठी 31 कोटींचे अनुदान अपेक्षित आहे. व्यापारी संकुलांतून 3 कोटी, बाजार व दुकानांमधून 1 कोटी 35 लाख, सांस्कृतिक भवनांच्या भाड्यापोटी 3 कोटी, परिवहन सेवा रॉयल्टीतून 31 लाख आणि अतिक्रमण दंडापोटी 12 लाख रुपयांच्या उत्पन्नाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. खर्चाच्या बाजूचा विचार करता, सामान्य प्रशासन आणि आस्थापनेवर 115 कोटी 96 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पेन्शन आणि इतर अंशादानासाठी 204 कोटी 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अग्निशमन विभागासाठी 90 लाख, सार्वजनिक दिवाबत्ती व विद्युत विभागासाठी 24 कोटी 98 लाख, पाणीपुरवठा व विहिरींच्या देखभालीसाठी 1 कोटी 20 लाख आणि स्वच्छतेसाठी 22 कोटी 67 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. आगामी मंगळवारी स्थायी समिती या आकड्यांवर अंतिम चर्चा करून अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देणार आहे.
अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे प्रमुख स्रोत-महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न घरपट्टीच्या माध्यमातून मिळणार असून, येत्या वर्षात 82 कोटी 50 लाख रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच चिल्लर वसुलीच्या कंत्राटातून 25 लाख आणि विविध शासकीय योजनांच्या व्याजातून 50 लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा होतील.

संबंधित बातम्या

Back to top button