‘मिशन फ्री फुटपाथ’ अंतर्गत अतिक्रमणावर मनपाची धडक कारवाई!
बडनेरा आणि इतवारा बाजारात जेसीबीने साफसफाई

-दोन ट्रक भरून साहित्य जप्त
अमरावती / 30 जुलै : शहरातील रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अमरावती महापालिकेने ‘मिशन फ्री फुटपाथ’ अंतर्गत बुधवारी सकाळी जोरदार मोहीम राबवली. झोन क्रमांक 4 अंतर्गत बडनेरा क्षेत्रात तर झोन 1 व 2 मधील इतवारा बाजार परिसरात मनपाच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यात आले, तर दोन ट्रक भरून साहित्य जप्त करण्यात आले.
बडनेरा क्षेत्रातील अलमास गेट ते बैल बाजार, सावता मैदान ते बडनेरा पूल या मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर, नाल्यांवर व फुटपाथवर पानठेले, चहा कॅन्टीन्स, कोंबडीचे पिंजरे, लोखंडी शेड्स यांसारखे व्यवसाय बेकायदेशीरपणे उभे करण्यात आले होते. यामुळे वाहनधारक आणि पादचार्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक कोंडी व सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला होता. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी आल्याने मनपाने एकदाच सर्व अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला.
झोन क्रमांक 1 व 2 अंतर्गत इतवारा बाजार परिसरातही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले होते. नाल्यांवर काँक्रीटच्या सिमेंट रॅम्प्स, लोखंडी खोके, शेड टाकून व्यापार्यांनी नाली सफाईस अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. त्यामुळे स्वच्छता विभाग आणि अतिक्रमण विभागाने संयुक्त मोहीम राबवत संपूर्ण अतिक्रमण हटवले.
ही कारवाई मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत पार पडली. यामध्ये झोन 1 चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, झोन 2 चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद, स्वच्छता निरीक्षक सचिन सैनी यांच्यासह पोलीस कर्मचारी व इतर मनपा कर्मचार्यांचा मोठा सहभाग होता. कारवाईदरम्यान दोन ट्रक भरून अतिक्रमणाचे साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित अतिक्रमणधारकांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे. पुढील वेळेस अशा अतिक्रमणांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
-नोटिस देवूनही टाळाटाळ
मनपाने यापूर्वी अतिक्रमणधारकांना 24 तासांत हटवण्याची नोटीस बजावली होती. मात्र अतिक्रमण न हटविल्यामुळे बुधवारी सकाळी 11.30 वाजता महापालिकेच्या पथकाने पोलिस दलाच्या मदतीने जेसीबी लावून अतिक्रमण हटवण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली. कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले, तर काही ठिकाणी व्यापार्यांनी विरोधही केला.




