मनपा आयुक्त सौम्या शर्मांची मोदी हॉस्पिटलला भेट

अनूपस्थित कर्मचार्‍यांना नोटिस देण्याचे आदेश

-रुग्णसेवा व स्वच्छतेची केली पाहणी
अमरावती / 9 जुलै: अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलला अचानक भेट दिली आणि तेथील रुग्णसेवा, स्वच्छता आणि कर्मचार्‍यांची उपस्थिती यांची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान रुग्णालयातील बरेच कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्याबाबत नाराजी व्यक्त करुन आयुक्त सौम्या शर्मा चांडक अशा कर्मचार्‍यांना त्वरित कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश अधिनस्थ अधिकार्‍यांना दिले.
मनपा आयुक्तांचा हा निर्णय रुग्णालयातील शिस्त व कार्यक्षमता सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, आयुक्तांनी रुग्णालयातील स्वच्छता, वैद्यकीय सुविधा व रुग्णसेवेच्या दर्जाचा आढावा घेतला. आवश्यक तेथे तत्काळ सुधारणा करण्याचे निर्देश देत, रुग्णसेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख व्हावी, यावर त्यांनी भर दिला. शासनाच्या आरोग्यसेवा धोरणानुसार, सार्वजनिक रुग्णालयांत शिस्तबद्ध सेवा देणे अत्यावश्यक आहे, आणि त्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे संकेतही त्यांनी दिले. या भेटी दरम्यान उपायुक्त योगेश पिठे उपस्थित होते.
-‘आधार’ निवारा कंद्रालाही सदिच्छा भेट
अमरावती महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणार्‍या बडनेराच्या ‘आधार’ शहरी बेघर निवारा केंद्रालाही महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी निवार्‍यात वास्तव्यास असलेल्या वृद्ध, दिव्यांग आणि मनोरुग्ण बांधवांची सखोल चौकशी केली. केंद्रातील स्वच्छता, सेवा-सुविधा आणि व्यवस्थापनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निवार्‍यात दैनंदिन आरोग्य तपासणी व डॉक्टरांची नियमित भेट सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. तसेच निवार्‍यातील मोकळ्या जागेत परसबाग (किचन गार्डन) तयार करण्याबाबतही सूचना दिल्या. ‘आधार’ केंद्र हे सामाजिक देणगीदारांच्या सहकार्याने चालविले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यात आवश्यक त्या सर्व गोष्टींचा पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. या भेटीप्रसंगी उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर, भूषण बाळे, प्रफुल ठाकरे, निवारा संचालक राजीव बसवनाथे, व्यवस्थापिका ज्योती राठोड, काळजीवाहक विलास थोरात, सदानंद ठाकरे आणि रोहित घोंगडे आदी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वतीने अशा उपक्रमांद्वारे समाजातील दुर्बल घटकांसाठी शाश्वत आणि सन्मान्य निवार्‍याची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button