नागरिकांच्या तक्रारीवरून मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी केली नाल्यांची पाहणी

अमरावती /24 सटेंबर : नागरिकांच्या तक्रारीला तत्परतेने प्रतिसाद देत अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी वारकरी नगर, ज्योती कॉलनी, कुंभारवाडा व स्वागतम कॉलनी परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी परिसरातील साफसफाईची स्थिती, कच्चे रस्ते, नाल्यांची स्वच्छता व वाहतुकीची अडचण याबाबत थेट निरीक्षण केले. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी सांडपाणी व्यवस्थापन, नाल्यांची नियमित सफाई, कच्च्या रस्त्यावरील खड्डे आणि कचरा व्यवस्थापनाबाबत समस्या मांडल्या. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी उपस्थित अधिकार्‍यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देत, संबंधित विभागांनी जबाबदारीने कार्यवाही करावी असे स्पष्ट आदेश दिले. विशेषतः स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग, प्रकाश विभाग व उद्यान विभागाला नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे सांगण्यात आले. नागरिकांशी थेट संवाद साधत आयुक्तांनी ओशासन दिले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येईल. नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. या पाहणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, महानगरपालिकेकडून तात्काळ कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, परिसरातील कच्च्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत, नाल्यांची नियमित स्वच्छता व देखभाल करावी, परिसरातील कचरा व्यवस्थापनाबाबत त्वरित उपाययोजना करावी, नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देऊन निराकरण करावे व संबंधित विभागांनी जबाबदारीने व समन्वयाने कार्यवाही करावी. आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले की, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे, कचरा वेळेत व ठरलेल्या ठिकाणी टाकावा, रस्ते व नाल्यात टाकू नये. स्वच्छता राखणे ही फक्त महानगरपालिकेची नव्हे तर सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. समस्या आढळल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी. शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, माजी नगरसेविका सुमती ढोके, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाणे, स्वास्थ्य निरीक्षक वैभव खरड, सावरकर, सागर राजुरकर, कंत्राटदार प्रतिनिधी, मनपा कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button