मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची जयस्तंभ चौक वसंत टॉकीज परिसरात केली पाहणी
नागरिकांच्या तक्रारींवर त्वरीत कारवाईचे निर्देश

अमरावती /9 ऑक्टोबर : महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज, दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी जयस्तंभ चौक येथील वसंत टॉकीज परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी परिसरातील नाली आणि स्वच्छतेचा बारकाईने आढावा घेतला. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन त्यांनी त्वरित पाहणी केली आणि समस्या जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून त्वरित कारवाईचे आदेश दिले. आयुक्तांनी सफाई कामगार लावून परिसरातील नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश दिले तसेच नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
आयुक्तांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित उपाययोजना करणे हे महानगरपालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यांनी परिसरातील दुकानदार आणि नागरिकांना नाली व रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. अमरावती महानगरपालिका सतत शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या निर्देशांमुळे शहरातील नागरिकांसाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पाहणीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, जयस्तंभ चौक आणि वसंत टॉकीज परिसरातील नाल्या पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी तत्काळ सफाई कामगारांची नेमणूक करावी. नागरिकांच्या तक्रारींचा अभ्यास करून संबंधित अधिकार्यांनी त्वरित कारवाई करावी. दुकानदार आणि नागरिकांना नाल्या व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करावे आणि त्यांच्यासोबत नियमित सहकार्य साधावे. नाल्या, रस्ते आणि परिसराची नियमित साफसफाई सुनिश्चित करण्यासाठी वेळापत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी नियमित चौकशी आणि निरीक्षण करावे.
महानगरपालिकेच्या कामकाजाची पारदर्शकता आणि तत्परता कायम ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकांच्या सुविधांवर सतत लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. अमरावती शहरातील नागरिकांना आवाहन करताना आयुक्त सौम्या शर्मा चांडक म्हणाल्या की, सर्व नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे. नाल्या, रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कचरा योग्य ठिकाणी टाकावा आणि अनधिकृत पद्धतीने टाकलेल्या कचर्याची माहिती महापालिकेला द्यावी. दुकानदारांनी आपल्या व्यावसायिक परिसराची स्वच्छता राखावी, जेणेकरून सर्वांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळेल. नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या किंवा तक्रारी थेट महापालिकेकडे कळवाव्यात, जेणेकरून तत्काळ उपाययोजना करता येतील.
आयुक्तांनी शेवटी सांगितले की, “आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच अमरावती शहर स्वच्छ, सुरक्षित आणि सुयोग्य राहू शकते.” या पाहणीदरम्यान सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, उपअभियंता प्रमोद इंगोले, लक्ष्मण पावडे, ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक विजय बुरे, स्वच्छता निरीक्षक प्रशांत गावनेर, मनपा कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.




