बेलोरा विमानतळावरून मुंबई विमानाचे उड्डाण रद्द
54 प्रवाशांची झाली निराशा

* विमान कंपनीने सांगितले तांत्रिक कारण
अमरावती /3 ऑक्टोबर : अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी असलेली एकमेव विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार उपलब्ध आहे. मात्र शुक्रवारी ऐनवेळी ही सेवा रद्द झाल्याने बेलोरा विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या 54 प्रवाशांना निराशा सहन करावी लागली. अमरावती-मुंबई मार्गावरील अलायन्स एअरलाइन कंपनीचे उड्डाण तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पटेल यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईहून येणारे विमान आले नसल्याने परतीचा प्रवास देखील रद्द करण्यात आला. आजच्या विमानसेवा रद्द झाल्याची माहिती सर्व प्रवाशांना सकाळी 10 वाजता देण्यात आली होती आणि पुढील सोमवारी प्रवास करण्याचा पर्याय देण्यात आला.
मुंबईसाठीची ही एकमेव सेवा वारंवार तांत्रिक कारणांमुळे रद्द होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, कंपनीने 26 ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक जाहीर केले असून रविवारी विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी सेवेला झालेल्या अडथळ्याचे कारण हैदराबादहून मुंबईला जाणारे विमान रद्द होणे असल्याचेही स्पष्ट झाले, कारण हेच विमान अमरावतीला येणार होते. अलायन्स एअरने सोमवारी होणाऱ्या विमानसेवेसाठी जागा उपलब्ध झाल्याचीही माहिती दिली आहे.




