वंचितसोबत युती न होण्यामागील कारणे बाळासाहेबांना माहित – खा. ओवैसी

अमरावती/4 जानेवारी – वंचित बहुजन आघाडीसोबत युती का झाली नाही, याचे कारण बाळासाहेब आंबेडकर यांना माहित आहे, असा खळबळजनक खुलासा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकार परिषदेत केला. ओवैसींच्या वक्तव्याने नव्या राजकीय वादाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची युती राज्याने अनुभवली आहे.
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये एमआयएमची वंचितसोबत युती का नाही, असा थेट प्रश्न आपली मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल यांनी खा. ओवैसी यांना विचारला. त्यावर उत्तर देताना ओवैसी म्हणाले, युती न होण्यामागील कारणे प्रकाश आंबेडकर यांना माहित आहे. एवढेच उत्तर देऊन त्यांनी अनेक प्रश्नांना जन्म दिला. खा. असदुद्दीन ओवैसी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली. संपादक अनिल अग्रवाल यांनी खा. ओवैसी यांना काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलते केले. ‘तुम्ही नरेंद्र मोदींना ‘ मोडी’ का म्हणता?’ या प्रश्नावर ओवैसी म्हणाले, माझी शैलीच अशी आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ओवैसी म्हणाले, मला एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित धरू नका. मी केवळ मुसलमानांचा नेता नाही. मी संविधानाचा नेता आहे. ज्यांचे आवाज दाबले जातात, त्यांचा आवाज होऊन मी बोलतो.खा. ओवैसी यांना तुम्ही महाराष्ट्रात वारंवार येण्यामागील रहस्य काय ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, महाराष्ट्र ही समाजसुधारकांची आणि संविधानाची भूमी आहे. येथील जनता समजदार असून व्यवस्थेला प्रश्न विचारणारी आहे. त्यामुळे मला महाराष्ट्रात वारंवार यायला आवडते. अमरावतीच्या माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अलिकडेच हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा, असे आवाहन केले होते. या मुद्द्यावर अनिल अग्रवाल यांनी प्रश्न विचारला असता ओवैसी म्हणाले, अशा प्रकारची बयाणबाजी समाजाला विभाजित करणारी आहे. समाजासमोरील खर्‍या प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशी वक्तव्ये केली जातात. महागाई, बेरोजगारी आणि विकास या मुद्द्यांवर त्यांना बोलायचे नाही. कोणी किती मुले जन्माला घालावीत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसर्‍याच्या जीवनाचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.
अमरावती महापालिकेच्या निवडणूक प्रचारातील मुद्द्यांवर बोलताना ओवैसी म्हणाले, अमरावतीत गेल्या सात वर्षांपासून चित्रा चौक येथील उड्डाणपुलाचा प्रश्न रखडलेला आहे. येथील स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र कोणालाही याचे गांभीर्य नाही. उड्डाणपुलाचे काम एमआयएम पूर्ण करेल. जनतेला केवळ आश्वासने नको आहेत, तर विकास हवा आहे.निवडणुकांच्या रणधुमाळीत एमआयएम जोरदार प्रचार करणार असून ‘ धाकटे ओवैसी’ अमरावतीला येणार आहेत. एमआयएम मजबुतीने काम करणार असल्याचेही खा. ओवैसी यांनी प्रश्नोत्तराच्या दरम्यान सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button